गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली : कर्जमाफी करुन दिवाळीपूर्वी शेतकऱ्याचं तोंड गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र,  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने घाईघाईत १८ ऑक्टोबरला राज्य शासनाने एका विशेष कार्यक्रमात काही निवडक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचं वाटप केलं होतं. मात्र, त्याला आज पाच दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाही. तसेच त्या सत्कारानंतर शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र परत घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडं वैजनाथ घ्यार या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. वैजनाथ घ्यार हे हिंगोली जिल्ह्याच्या साटंबा गावचे रहिवासी असून त्यांनी बडोदा बँकेकडून एक लाख रुपये पीक कर्ज घेतलं आहे. १८ ऑक्टोबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते वैजनाथ घ्यार यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मात्र, कर्जमाफीची रक्कम अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.


खरं तर वैजनाथ यांच्यावर एक लाख रुपयांचं कर्ज आहे मात्र, त्यांना केवळ दहा हजार रुपयांच्या कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. उरलेलं ९० हजार रुपयांचं कर्ज माफ होणार की नाही? अशी प्रश्न वैजनाथ यांना सतावू लागला आहे. 
अशीच अवस्था धनाजी घ्यार या शेतकऱ्यांची झाली आहे.


धनाजी घ्यार यांनी बँक ऑफ बडोदाच्या हिंगोली शाखेतून ६० हजार रुपयांचं पीक कर्ज घेतलं आहे. मात्र, सरकारच्या यादीत धनाजी यांनी शिरढोनच्या मराठवाडा ग्रामीण बँकेतून कर्ज घेतल्याचं नमुद करण्यात आलं आहे. शिराढोन हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. या सरकारी गोंधळात कर्जमाफी कशी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांनाना पडला आहे. मात्र, सरकारानं घाईघाईत दिवाळीपूर्वी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा घाट घातला.


हिंगोली जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये साटंबातील १३ शेतकऱ्यांचा समावेश असून सत्कारानंतर शेतकऱ्यांकडून ते प्रमाणपत्र परत घेण्यात आली. त्यामुळं सरकार खरंच कर्जमाफी करणार आहे का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.


दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून बळीराजाची दिवळी गोड करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, दिवाळी उलटून गेली तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक दमडीही जमा न झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला असून कर्जमाफीसाठी आणखी किती काळ वाट पाहायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.