प्रणव पोळेकर झी24 तास रत्नागिरी: पापलेट, सुरमईसह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या - तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा सुरू झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी एक ना अनेक नावं ऐकल्यानंतर आपल्यातील मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. दरम्यान, बाजारात गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये थालीची ऑर्डर दिल्यानंतर माशांच्या आकाराकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. अर्थात दर देखील याच आकारमानावरून ठरतात. दरम्यान, याच माशांचं आकारमान निश्चित करून त्यांना पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारनं काही निर्बंध आणले आहेत.


यामध्ये 54 माशांचा समावेश आहे. त्यामुळे सुरमई असो किंव बांगडा, सौदळा असो किंवा पापलेट यासह इतरही 54 माशांचं आकारमान निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या आकरामानापेक्षा आकारानं लहान असलेला मासा पकडता येणार नाही. शिवाय, त्याची खरेदी विक्री देखील करता येणार नाही.


दरम्यान आकारमान निश्चित केलेल्या माशांमध्ये सुरमई 370 मिमी, बांगडा 140 मिमी, सरंगा 170 मिमी, तारली 100 मिमी, सिल्वर पापलेट 135 मिमी, चायनीज पापलेट 140 मिमी, भारतीय म्हाकूळ 100 मिमी, झिंगा कोळंबी 90 मिमी, मांदेली 115 मिमी, मुंबई बोंबील 180 मिमी यासह इतर प्रजाती मिळून 54 प्रजातींसाठी हे आकारमान अशाप्रकारे निश्चित केले आहेत. 


सध्या माशांच्या साठ्यात कमतरता येत असलेल्याचं दिसून येत आहे. काही मासे हे लुप्त होण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीनं शासनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. पण यामध्ये अडचणी देखील असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिली. 


माशांचं संवर्धन होणे आणि लहान माशांची वाढ होऊन मत्स्य साठा वाढत जाणे या दृष्टीनं सदरचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यासाठी मच्छिमारांसह खवय्ये आणि आपणा सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे असलेल्या अडचणींवर मार्ग काढत प्रत्येकानं जबाबदारीनं वागून नियमांचं पालन करणं गजरेचं आहे.