मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकरले जात असल्याचे प्रकार समोर येत होते. याप्रकरणी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची होणारी ही लूट टाळण्यासाठी सरकार खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे.  अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल.


खाजगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहित करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. २४ तास ह्या अधीग्रहित केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी  (महापालिका क्षेत्र वगळता ) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे.  त्यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतर (किलोमीटर्स) याचा विचार करण्यात यावा असं, या शासन निर्णयात म्हटले आहे.


या रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील अथवा जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील. रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.