३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा आज निकाल
राज्यभरात पार पडलेल्या तब्बल ३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (९ ऑक्टोबर) लागत आहे. त्यामुळे गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण महाराष्ट्राची पहिल्या टप्प्यातील उत्सुकता संपणार आहे. पण, त्याचसोबत ग्रामीण महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या नेमका कोणासोबत याचेही उत्तर मिळणार आहे.
मुंबई : राज्यभरात पार पडलेल्या तब्बल ३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (९ ऑक्टोबर) लागत आहे. त्यामुळे गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण महाराष्ट्राची पहिल्या टप्प्यातील उत्सुकता संपणार आहे. पण, त्याचसोबत ग्रामीण महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या नेमका कोणासोबत याचेही उत्तर मिळणार आहे.
या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वैशिष्ट्य असे की, या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवड होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ८ ऑक्टोबरला मतदान झाले होते. या मतदानाची सरासरी ७९ इतकी होती अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी त्यावेळी दिली होती.
कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान
नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्य़ांमधील एकूण ३१३१ ग्रामपंचायतींसाठी ८ ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. ग्रामपंचायतींसाठी झालेले मतदान हे पारंपरीक पद्धतीनेच झाले असले तरी, थेट जनतेतून पहिल्यांदाच सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली होती.
१६ ऑक्टोबरला दुसरा टप्पा
दरम्यान, पहिल्या टप्प्याचा निकाल लागल्यावर येत्या १६ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातही 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसह रिंगणात आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी मतदान
जिल्हा -जागा
नाशिक १५०
धुळे ९६
जळगाव १०१
नंदुरबार ४२
अहमदनगर १९४
औरंगाबाद १९६
बीड ६५५
नांदेड १४२
परभणी १२६
जालना २२१
लातूर ३२४
हिंगोली ४६
अकोला २४७
यवतमाळ ८०
वाशिम २५४
बुलडाणा २५७
एकूण ३१३१