मुंबई : संपूर्ण देशाला कोरोनाची झळ पोहोचत आहे. याला कोणतेच राज्य अपवाद नाही. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने इथल्या प्रशासनाकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. महाराष्ट्र कोरोनाला आटोक्यात आणण्यास अपयशी ठरतोय ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. पण राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकडेवारी देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अधिक वैद्यकीय चाचण्या होत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यात २५,७५३ लोकांच्या वैद्यकीय चाचणी करत आहे. याची सरासरी १६५/दशलक्ष आहे.



इतर भारतात वैद्यकीय चाचणीची सरासरी केवळ ९५/दशलक्षची आहे. एकूण चाचण्यांपैकी ४.४१% या पॉज़ीटीव केसेस असल्याचे देशमुख म्हणाले.



केंद्रावर टीका


निजामुद्दीने इथल्या तबलिगी मरकज कार्यक्रमाला हजर राहिलेल्यांमुळे देशातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यातील अनेक जण महाराष्ट्रातीलही आहेत. निजामुद्दीनहून परत आल्यानंतर या सर्वांनी समोर येऊन आपली आरोग्य तपासणी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं होतं.


मात्र यातील ५० ते ६० जण अद्याप फरार असून त्यांनी आपले मोबाईल फोन बंद केल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली होती. त्यानंतर आज देशमुख यांनी तबलिगी जमातीशी संबंधित एक पत्रक जारी केलं आहे.


या पत्रकात त्यांनी थेट केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले असून तबलिगींशी केंद्र सरकारचा संबंध असल्याचा थेट आरोप केलाय. त्याचबरोबर तबलिगींमुळे सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रसाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचाही  अप्रत्यक्ष आरोप देशमुख यांनी केला आहे.