महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य; सासवड देशातील सर्वात स्वच्छ शहर
India Cleanest City : Annual Cleanliness Survey : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राने भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडचा क्रमांक लागला आहे.
India Cleanest City : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर आणि सुरत यांना संयुक्तपणे भारतातील सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. इंदौरने सलग सातव्या वर्षी हा पुरस्कार जिंकला आहे. तर सुरतला पहिल्यांदाच हे यश मिळाले आहे. याशिवाय, यंदाच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. यासोबत नवी मुंबई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा क्रमांक लागला आहे. राजधानी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही उपस्थित होते. 2016 मध्ये स्वच्छ भारत मिशन-अर्बन अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली होती. 4,416 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, 61 छावण्या आणि 88 गंगा शहरे 2023 या वर्षासाठी पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राला स्वच्छ राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेले सासवड शहर देशातली सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले आहे. तर एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. यासोबत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर भोपाळ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे.
या सर्वेक्षणात एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड देशातून प्रथम आलं आहे. तर छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशसा द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्या वर्षी या सर्वेक्षणात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता.