कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : राज्यातील जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरुच आहे. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटुंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी-वडगाव गावात जातपंचायतीचा हा जाच समोर आलाय. रंगपंचमीच्या दिवशी जातपंचायत भरली आणि अनिष्ठ प्रथांविरोधात लढा देणाऱ्या एका कुटुंबाविरोधात बहिष्काराचा फतवा काढण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
श्रीरामपूर (ShreeRampur) तालुक्यातील निपाणी वडगाव इथं राहणारे डॉक्टर चंदन लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वैदू समाजातील (Vaidu Community) अनिष्ठ रूढी परंपरा, जातपंचायत (Jat Panchayat) या विरोधात लढा देत आहेत. समाजातील तरूणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजातील अस्पृश्यतेची दरी दूर करावी यासाठी काम करताहेत. चंदन लोखंडे यांनी जातपंचायत विरोधात सातत्याने लढा दिल्याने काही वर्षांपुर्वी जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णयही घ्यावा लागला होता. मात्र काही दिवसापूर्वी रंगपंचमीच्या दिवशी मढी इथं जातपंचायत पुन्हा भरली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. चंदन लोखंडे यांच्या कुटुंबावर जातपंचायतने अघोषित बहिष्कार (Boycott) टाकलाय..


आईच्या अंतिम विधीला जाण्यासही बंदी
जातपंचायतने लोखंडेच्या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याने काही दिवसापासून चंदन लोखंडे यांच्या कुटूंबाला कोणत्या कार्यक्रमात बोलावलं जात नाही. इतकंच काय तर त्यांच्या घरीही कोणी जात नाही. पंधरा दिवसापूर्वी चंदन लोखंडे यांच्या आईचं निधन झालं. मात्र त्यांच्या सांत्वनाला किंवा दशक्रीया विधीलाही जातपंचायतच्या फतव्यामुळे नातेवाईकांना जाता आलं नाही.


चंदन लोखंडे सातत्याने समाजातील अनिष्ठ रूढीं विरोधात लढत असल्यानेच जातपंचायतच्या पंचांनी त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकलाय.. वैदू समाजातील पंचांची मोठी दहशत असल्याने कायम भितीच्या सावटाखाली चंदन लोखंडे यांची पत्नी असते.


जातपंचायतीचा जाच सुरुच
अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या रंजना गवांदे यांनी वैदू समाज जातपंचायत बंद व्हावी यासाठी मोठा लढा उभारला होता. यातून जातपंचायत विरोधी कायदाही अंमलात आला , जातपंचायतही रद्द करण्यात आली मात्र आता पुन्हा नव्याने जातपंचायत सुरू झाल्याने सरकार आणि पोलीसांनी यावर कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.


हेही वाचा : धक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं


आज जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना काही समाज अजूनही आपल्या अनिष्ठ परंपरा सोडताना दिसत नाहीए.. अशा समाजांनी गरज आहे रूढी परंपरांना तीलांजली देण्याची..