सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : ब्राह्मण समाज (Brahmin Society) हा भाजपचा (BJP) पारंपारिक मतदार मानला जातो. मात्र कसबा पोटनिवडणुकीत (Kasaba By Poll Election) ब्राह्मण समाज हा भाजपवर नाराज असल्याचं सांगितलं जातंय. पिंपरीत लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळते मग मुक्ता टिळकांच्या (Mukta Tilak) जागेवर त्यांच्या कुटुंबातील कुणालाच उमेदवारी का नाही? अशी उघड नाराजी ब्राह्मण समाजाकडून व्यक्त करण्यात येतेय. याच पार्श्वभूमीवर परिसरात सूचक पोस्टरबाजी कसब्यात करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?' असा प्रश्न या बॅनरवर (Banner) उपस्थित करण्यात आलाय. हे बॅनर्स कुणी लावले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बॅनर्सवर कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही, पण  लिहिणाऱ्याचं नाव  'कसब्यातील एक जागरूक मतदार' असं नमूद करण्यात आलं आहे. हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आनंद दवेंचा आरोप
ब्राह्मण उमेदवाराला डावलण्यात आलं असा थेट आरोप हिंदू महासंघाचे (Hindu Mahasangha) नेते आनंद दवेंनी केलंय. 'गेल्या वेळी मेधा कुलकर्णी कोथरूडमधून बाद झाल्या आहेत. आता टिळक बाद झालेत. त्यामुळे 21 आमदारांपैकी एकही आमदार असा नाही जो ब्राह्मण समाजाची बाजू घेतो असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. तसंच ब्राह्मण समाजावर जेव्हा आरोप होतात, त्याचं उत्तर ठापपणे देणारा प्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे असं आमचं मत आहे. उद्या वेगळ्या समाजावर अन्याय झाला असता, तरी आमची हीच भूमिका असती. चिंचवडला न्याय लावला गेला, तोच न्याय टिळक घराण्याला लावला जायला हवा होता' असं आनंद दवे यांनी म्हटलंय. 


कसबा मतदारसंघात पहिल्यांदाच उघडपणे ब्राह्मण-ब्राह्मणेतर उमेदवारांची चर्चा घडतेय. पॉलिटीकल रिसर्च अँड अॅनलेसिस ब्युरो या संस्थेच्या अहवालानुसार..


इतर मागासवर्ग - 31.45 - 86,622 


मराठा + कुणबी- 23.85 - 65,690


ब्राह्मण - 13.25- 36.494


मुस्लिम - 10.50 - 28,920


अनुसूचित जाती - 9.67 - 26,634


या मतदारसंघात ब्राह्मण समाज हा बहुसंख्य नाही किंवा निर्णायक भूमिकेतही नाही. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आता कसब्यात ब्राह्मण नेतृत्व राहिले नाही असं वक्तव्य केलं आहे. 


पुण्यात कोथरूडमध्ये स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत पाटील निवडून आले तरी मेधा कुलकर्णींचं 1 लाखांचं मताधिक्य पाटलांसाठी 20 हजारांवर आल्याचं दिसून आलं. ब्राह्मण समाजाच्या नाराजीमुळे मताधिक्य घटलं असं बोललं गेलं. कोथरुडनंतर आता कसबा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाची नाराजी दिसून आलीय. जातीविरहित हिंदुत्वाची भाषा करणारा ब्राह्मण समाज अचानक जातीच्या उमेदवारासाठी आक्रमक का झाला याचीही चर्चा सुरु झालीय.