जालना: जालन्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर गेल्यावेळचा महाराष्ट्र केसरी काका पवार तालीमने बहिष्कार घातलाय. अभितीत कटके विरुद्ध गणेश जगताप कुस्तीदरम्यान पंचांनी वेळेआधीच शिट्टी वाजवल्याचा दावा काका पवारांच्या तालमीतील मल्लांनी केला. यानंतर आयोजक आणि काका पवार यांच्या तालमीतील मल्लांचा वाद वाढत गेला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की, आयोजकांपैकी आत्माराम भगत आणि दयानंद भगत यांनी मल्लावर हात उचलला. य़ानंतर काका पवार यांच्या तालमीतील मल्लांनी मैदान सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. 


काही काळ आखाड्यात ठिय्याही दिला. पोलीसांच्या मध्यस्थीनंतर आता वाद निवळला असून चार वाजता वेळपत्रकानुसार समाने सुरू होणार आहेत. जालन्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते हा पक्षपतीपणा करत असल्याचा आरोप काका पवार यांनी केलाय. तर दरम्यान चांगलं नियोजन केलेलं असतानाही कोणी जाणीवपूर्वक या स्पर्धेला गालबोट लावत असेल तर पोलीस कारवाई करण्याचा इशारा आयोजक आणि जालन्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.