Women's Wrestling : महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रासाठी आताची मोठी बातमी आहे. राज्यात पहिल्यांदाच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Women's Maharashtra Kesri Wrestling) रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे (Maharashtra State Wrestling Council) महासचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा आणि शहर तालीम संघाच्या वतीने पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सांगली (Sangli) इथं खेळवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीत रंगणार कुस्ती स्पर्धा
महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत 23 आणि 24 मार्च रोजी होणार असून दहा वजनी गटासह खुल्या गटांतील महिला कुस्तीपटू यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील महिला पैलवान (Women Wrestler) सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार असल्याची माहितीही  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दिली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे तसंच ही स्पर्धा फक्त मॅटवर खेळवली जाणार आहे.


कुमार गटाच्या स्पर्धाही होणार
या स्पर्धेबरोबर कोल्हापूर इथं 25 आणि 26 मार्चला कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाही खेळवली जाणार आहे. तर वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा 27 आणि 28 मार्च रोजी कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र इथं अमोल बुचडे आणि अमोल बराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही बाळासाहेब लांडगे यांनी यावेळी दिली.