Amravati Lok Sabha 2024 Results: अमरावती लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत होता. अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात लढत होती. या अटीतटीच्या लढतीत बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. नवनीत राणा यांच्या पराभवानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. नवनीत राणा या 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अपक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, 2024मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन लोकसभा लढवली होती. मात्र काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी नवनीत राणांना पराभूत केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे बळवंत वानखडे?


सरपंच ते आमदार आणि आता थेट खासदार असा बळवंत वानखडे यांचा राजकीय प्रवास आहे. सुरुवातीला बळवंत वानखडे हे एका कनिष्ठ महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजयदेखील मिळवला. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही ते तीन वेळा निवडून आले होते. बळवंत वानखडे यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून निवडून गेले होते. 


2014 मध्ये बळवंत वानखडे यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत बळवंत वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांचा पराभव केला होता. 


लोकसभा 2024 साठी बळवंत वानखेडे यांच्या नावाची चर्चा होती. काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांनाच अमरावतीत उमेदवारी मिळावी, यासाठी मोठे प्रयत्न केले. बळवंत वानखडे यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळं बळवंत वानखेडे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. नवनीत राणा यांच्या विरोधात बळवंत वानखेडे यांचे तगडे आव्हान होते.