फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत दिल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले `कदाचित विनोद तावडे...`
Devendra Fadnavis Resgination: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत आपल्याला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केली आहे.
Devendra Fadnavis Resgination: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत आपल्याला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी "मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल," असं सांगितलं. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी 'झी 24 तास'शी संवाद साधताना यावर प्रतिक्रियी दिली आहे.
'जो बुंद से गयी वो हौद से नहीं आएगी' अशी हिंदीत म्हण आहे असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. तसंच कारवाई होण्याची शक्यता असल्याने त्यांनी सन्मानपूर्वक बाहेर जाण्याची मागणी केली असावी असंही त्या म्हणाल्या आहेत. "अत्यंत वाईट प्रदर्शन झाल्याने कारवाई होऊ शकते. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते, प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं यावरही चर्चा झाली असावी. हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली तर तो मोठा धक्का असेल. त्यापूर्वी त्यांना आदरपूर्वकपणे बाहेर जाण्याची परवानगी मागावी या आशेने त्यांनी ही मागणी केली असावी," असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे कदाचित मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात. देवेंद्र फडणवीस चेहरा असणार नाहीत असा मोठा दावाही त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
"जागा कमी आल्यात हे तथ्य आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी भाजपाकडे अजून विनंती करणार आहे. भाजपामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल,. ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझा पूर्ण वेळ देता येईल," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.