मुंबईत महिलेचा पाठलाग करणा-या भामट्याला अटक
मुंबईत महिलांच्या विनयभंगाच्या संतापजनक घटना समोर येत असतानाच आंबोली पोलिसांनी महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. नितीशकुमार शर्मा असे या ३६ वर्षीय आरोपीचे नाव आहे.
मुंबई : मुंबईत महिलांच्या विनयभंगाच्या संतापजनक घटना समोर येत असतानाच आंबोली पोलिसांनी महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. नितीशकुमार शर्मा असे या ३६ वर्षीय आरोपीचे नाव आहे.
फॅशन डिझायर म्हणून काम करणारी ही महिला रविवारी रात्री वीरा देसाई मार्गावरुन कारमधून घरी परतत होती. तेव्हा नितीशकुमार शर्मा हा त्या महिलेचा पाठलाग करु लागला. महिला घरी पोहोचेपर्यंत त्याने तिचा पाठलाग केला. इतकेच नाहीतर महिलेच्या इमारतीबाहेर कार पार्क करुन तो बराच वेळ तिथेच थांबूनही होता. हा सगळा प्रकार महिलेच्या लक्षात आला. महिलेने आवाज उठवताच नितीशकुमार शर्मा तिथून पळून गेला. तिने या घटनेप्रकरणी आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
आंबोली पोलिसांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी नितीशकुमार शर्माला अटक केली. संबंधीत महिलेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार फेसबुकवरही शेअर केला. ‘दिल्लीपेक्षा मला मुंबई महिलांसाठी जास्त सुरक्षित वाटायची. पण रविवारी रात्री एका व्यक्तीने माझा पाठलाग केला. माझ्या घराबाहेर तो थांबला होता. त्याच्या डोळ्यात पश्चातापाची भावनादेखील नव्हती’ असे त्या महिलेने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.