प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : कितीही कडक नियम लागू केले तरी घोटाळा (Scam) करणारे काही ना काही क्लुप्ती लढवत घोटाळे करतातच. यातूनच भ्रष्टाचाराची (Corruption) पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत, हे सिद्ध होतं. गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (Construction Department) असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे. याची राज्यभरात चर्चा सुरु आहे. आधी मृत व्यक्तीच्या नावाने टेंडर (Tender in Name of Deceased) मंजूर केले, नंतर बोगस स्वाक्षऱ्या (Bogus Signatures) करत तब्बल 72 लाख रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी स्वतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गोपनीय तक्रार केली होती. मात्र आज महिना लोटला तरी कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात चालले तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


बोगस नावाना काढली टेंडर
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत 8 लाख रुपये किमतीच्या विद्युतीकरणाची 8 कामं गोंदिया शहरातील बग्गा यांच्या कंपनीला देण्यात आली होती. त्यामध्ये भरनोली उपकेंद्र खोबा, मेंढा उपकेंद्र खेडेपार, डोंगरगाव डेपो, धापेवाडा, झाशीनगर, करटी इथल्या कामासाठी निविदा मंजुर करण्यात आली होती. यातच भरनोली इथल्या उप केंद्रासाठी 7 लाख 15 हजार रुपयांच्या कामाची निविदा गोंदियातील पी.ए. बग्गा कॉन्ट्रक्टर एण्ड सप्लायर यांनी सादर केली होती. ती निविदा 0.11 टक्के कमी दराने सादर केल्याने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 4 मार्च 2022 ला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात बग्गा फर्मच्या संचालकांना वाटाघाटीसाठी बोलवण्यात आलं.


पण धक्कादायक म्हणजे बग्गा फर्मचे संचालक प्रितपालसिंग अमोलकसिंग बग्गा यांचा 19 फेबुवारी 2021 रोजी मृत्यू झाला.  पण असं असताना मार्च २२ मध्ये त्यांच्या नावावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात त्यांच्या नावावच चक्क टेंडरची वाटाघाटी झाली.  बग्गा यांच्या मुलाने मुख्याधिकऱ्यांच्या दालनात हजर राहून शासनाची फसवणूक करत सर्व वर्क आर्डर मिळवून घेतले असा आरोप करण्यात येत आहे. 


विशेष बाब म्हणजे एका टेंडरमध्ये एका फर्मला नियमाप्रमाणे तीन कामाच्या वर कामे देता येत नाही. तरी देखील बग्गा यांच्या फर्मला 13 कामांपैकी 8 कामे कशी देण्यात आली. त्यामुळे यात मोठे अधिकारी देखील सहभागी तर नाहीना असा प्रश्न निर्माण होत. असून स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज राहगडाले यांनी या संदर्भात गोपनीय तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे. तर या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता आमच्याकडे कुठलीही तक्रार आली नाही, अशी तोंडी माहिती बांधकाम विभागाने दिली असून चौकशी करून दोषींवर कार्यवाही करू असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे