Sanjay Rathod : शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत
Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री असताना गायरानाची 5 एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश संजय राठोड यांनी दिले होते. वाशिमच्या सावरगावमधलं हे प्रकरण आहे.
सरकारी इ-क्लास गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हे नियमित करण्याची कुठलीही तरतूद नियमांमध्ये नाही. असा व्यवहार कायद्यात बसत नसल्याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. तसेच ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असे आदेश दिले होते. तरीही संजय राठोड यांनी 29 जुलै 2019 ला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द ठरवला आणि पाच एकर गायरान जागा नियमित करुन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश दिले. तेव्हा आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर राठोडसुद्धा विरोधकांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
- सावरगावच्या इ-क्लास 5 एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण
- गायरान जमिनीवरचं अतिक्रमण नियमित होत नाही
- कायद्यात बसत नसल्याचा जिल्हाधिका-यांचा शेरा
- खासगी व्यक्तीला जमीन देता येणार नसल्याचा अहवाल
- राठोडांकडून जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश
गायरान जमीन घोटाळा, अब्दुल सत्तार काय उत्तर देणार?
दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बातमी आहे. अब्दुल सत्तार आज विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी काल अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा आणि सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरुन आरोप केले होते. त्याला आता सत्तार नेमकं काय उत्तर देणार याकडं सर्वाचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठराखण केलीय. नको ते आरोप करुन विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी
तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याच्या कारणावरुन मंत्रिमंडळातून त्यांना पाय उतार व्हावे लागले होते. पूजा चव्हाण मृत्यूनंतर तत्कालीन विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार हरकत घेण्यात आली होती. संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. तर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या घटनेच्या चौकशीची मागणी केली होती.