Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या कोकणातही पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. मात्र इतर 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यलो अलर्ट म्हणजे संबंधित जिल्हा किंवा शहरात नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.


मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबला असून, पुन्हा एकदा कडक ऊन पडत आहे. यामुळे मुंबईकरांना आता छत्री बाजूला करुन उकाडा दूर करण्यासाठी हवा खावी लागत आहे. दरम्यान, हेच वातावरण पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. येथे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 


पावसाचा जोर कुठे कमी होईल?


मुंबई, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


दरम्यान हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 


दरम्यान, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत उकाडा वाढला असून पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे. पण ही तापमानवाढ जास्त नसेल. राज्यात पुढील काही दिवस संमिश्र स्थिती असू शकते.