Maharashtra Weather News : जवळपास दोन महिन्यांच्या अवकाळीच्या माऱ्यानंतर राज्यात उन्हानं जोर धरला. पाहता पाहता मे महिन्यातील दिवसाचं तापमान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये 40 अंशांच्याही पलीकडे गेल्याचं पाहायला मिळालं. असं असतानाच आता मे महिनाही अखेरीकडे झुकताना राज्याच्या वेशीवर नेमका मान्सून येणार कधी? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या विदर्भ, पुणे, मध्य महाराष्ट्रासह कोकणातही सध्या तापमानाचा आकडा वाढत आहे. समुद्रालगत असणाऱ्या कोकण, मुंबई, पालघर, रायगड भागात उष्णतेचा दाह हवेतील आर्द्रतेमुळं अधिक जाणवत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हे चित्र बदलण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल अशी शक्यता वर्तवली आहे. 


हेसुद्धा वाचा : Video : दमदार आमदार... पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवळ यांनी केला डान्स


24 मे पर्यंत विदर्भातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. तर, नागपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्येही काही भागांत पावसाचा शिडकावा पाहायला मिळेल. 


सध्या कुठवर  पोहोचलाय मान्सून? 


काही दिवसांपूर्वीच अंदमान- निकोबार बेटांमध्ये पोहोचलेल्या दक्षिण पश्चिम मान्सूननं आता पुढील वाटचालीस सुरुवात केली आहे. शनिवारी मान्सूननं बंगालचच्या उपसागर क्षेत्राला व्यापण्यास सुरुवात केली आहे. पुढीस दोन ते तीन दिवसांतही तो समाधानकारक वेगानं पुढे जाताना दिसेल. बंगालचा उपसागर आणि नजीकच्या परिसराला पूर्णपणे व्यापण्यास मान्सूनला किमान आठ दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यानंतर तो कर्नाटकच्या दिशेनं पुढे सरसावेल.



महाराष्ट्रात केव्हा होणार मान्सूनचं आगमन? 


यंदा मान्सून काहीसा उशिरानं केरळात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली होती. पण, मान्सूनच्या प्रवासासाठीची परिस्थिती अशीच अनुकूल राहिल्यास 1 जूनपर्यंत तो केरळात सहज दाखल होईल असं सांगण्यात येत आहे. परिणामी 7 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून, पुढील काही दिवसांत म्हणजेच 11 जून रोजी तो मुंबईचं दार ठोठावेल. 


देश पातळीवर हवामानाचा अंदाज वर्तवायचा झाल्यास 23 मे पर्यंत नव्यानं आणखी एक पश्चिमी झंझावात हिमालयापर्यंत पोहोचेल. ज्यामुळं पुढील 24 तासांत उत्तर पूर्व भारतासह केरळात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागालाही पावसाचा तडाखा बसू शकतो. त्यामुळं मान्सूनही आता तुमच्यापासून फार लांब नाही, शिवाय उकाड्यापासूनही येत्या काही दिवसांत तुम्हाला उसंत मिळणार आहे हेच खरं.