मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मुंबई, गोवा महामार्ग, टोल अशा विविध प्रश्नांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. दरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसेनेही कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे परिसरातील तीन आणि पालघरमध्ये एक जागा लढवू शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी पालघर या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. येत्या काळात 70 हजारपेक्षा जास्त घरांमध्ये कशा पद्धतीने पोहोचता येईल? यावर रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. दरम्यान युवा तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये मनसेमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आत्तापर्यंत दुसऱ्यातल्या पक्षातले नेते फोडाफोडी करून तुम्ही पक्ष बांधणी केली आहे का? असा प्रश्न मनसेकडून भाजपला विचारण्यात आला. आमच्या कडे एक आमदार असला तरी तो स्वतःच्या जीवावर निवडून आलेला आहे. दुसऱ्यातल्या पक्षातील लोक घेऊन निवडून आलेला नाही. असे विधानही यावेळी करण्यात आले. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध भाजप यांच्यात वार-प्रहार पाहायला मिळणार आहेत.
दुसरीकडे 50 खोके म्हणणाऱ्यांच्या घरी कंटेनर आहेत, असे विधान पनवेलच्या सभेत राज ठाकरे यांनी करत शिवसेना ठाकरे गटालाही टोला लगावला होता.
भिवंडी ठाणे भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत.सर्वसामान्य नागरिकांना घेऊन खड्ड्यांच्या आंदोलन करा, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांवरुन आंदोलन केल्याने गुन्हा दाखल होत असेल तर आम्हला चालेल मात्र मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.