सावधान! लहान मुलाला बाईकवर पुढे बसवणं पडलं महागात, मुलाने एक्सिलेटर वाढवला आणि... थराराक Video
महाराष्ट्रातल्या कणकवली इथला हा धक्कादायक Video आहे, मुलांना बाईकवरुन फिरायला नेताना काळजी घ्या, अन्यथा अशी दुर्घटना घडू शकते
Shocking News : तुमच्या मुलांना जर तुम्ही बाईकवर (Motor Cycle) समोर बसवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुलाला समोर बसवल्यास कसं जीवावर बेतू शकतं तेच एका दृश्यातून समोर आलंय. सिंधुदुर्गातल्या कणकवलीत अशी एक घटना घडलीय. आपल्या लहान मुलीला बाहेर फिरायला नेण्यासाठी वडिलांनी तिला बाईकवर पुढे बसवलं.
वडिलांनी गाडी सुरूच ठेवली होती आणि ते मोबाईलवर बोलत होते. त्याचवेळी मुलीनं बाईकचं एक्सिलेटर (Accelerator) वाढवलं. त्यामुळे गाडी अचानक पुढे गेली आणि अपघात झाला. त्यात वडिलांच्या डोक्याला इजा झालीय. सुदैवाने मुलगी मात्र जखमी झाली नाही हा चित्तथरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
दुचाकीवर लहान मुलांना पालक प्रेमाने पुढे बसवितात मात्र काही वेळा आपला निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशीच एक घटना सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे घडली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक अनिस नाईक हे आपल्या मुलीला सायंकाळच्या सुमारास बाहेर फिरायला घेऊन जात होते. बाहेर जात असताना त्यांनी आपली दुचाकी घेतली व ते निघणार एवढ्यात त्यांना एक फोन आला तो फोन घेत असताना गाडी चालू आहे समोर आपली चिमुकली बसली आहे याचे भान त्यांना राहिले नाही. आणि अचानक मुलीने गाडीचे एक्सलेटर वाढविले त्यामुळे गाडी अचानक पुढे गेली बेसावध असलेल्या अनिस यांना काही समाजण्यापूर्वीच गडी पुढे गेल्याने अनिस नाईक हे घराच्या खांबाला आपटले व खाली कोसळले.
सुदैवाने या अपघातात चिमुकलीला काही दुखापत झाली नाही. गाडी पडल्यानंतर आवाज आल्याने नाईक यांच्या नातेवाईकांनी तात्काळ अनिस यांना उचलून खाजगी रुग्णालयात दाखल केले. बेसावध असताना गाडीने वेग घेतला आणि यात अनिस नाईक हे पाठीमागून जमिनीवर पडले. त्यामुळे त्यांच्या उजव्या खांद्याला, डोक्याला व पाठीला मार लागला नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
अनिस नाईक यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता ते आता सुखरूप असून त्यांना कोणतीही मोठी इजा झाली नसल्याचे त्यांनी संगितले. अपघाताचा हा चित्तथरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघाताची भीषणता पाहिल्यानंतर प्रत्येक पालकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. नाईक यांच्या गाडीच्या अपघाताची भीषणता पाहता सुदैवाने चिमुकलीला काही झाले नाही किंबहुना कोणतीही मोठी हानी झाली नाही.