प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार :  नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये डाकिनीची कुप्रथा महिलांसाठी अभिशाप ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. अंधश्रद्धेतून जन्माला आलेली डाकीण ही प्रथा काळाप्रमाणे बदलेल असं वाटत असताना, समाज माध्यमांवर एका महिलेचे विवस्त्र करून तिला चटके देण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये डाकीण ही प्रथा अजूनही अस्तित्वात आहे हे अधोरेखित झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेला नग्न करत तीचं चित्रीकरण करण्याचा किळसवाणा प्रकार व्हायरल झाला आहे. समाज माध्यमांवर ज्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत, त्यात एका महिलेला डाकीण ठरवून तिला शिक्षा म्हणून नग्न करण्यात आलं असुन तिच्या बाजूला तरुण आणि महिला उभ्या आहेत. या महिलेवर प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. तू डाकीण आहेस आणि तू कोणाला कोणाला त्रास दिला? असे प्रश्न स्थानिक बोली भाषा मध्ये विचारले जात आहे. 


सततच्या प्रश्‍नांनी घाबरून ती महिला शब्दही बोलायला तयार नाही. ती प्रचंड दहशतीखाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यावेळी महिलेसोबत हा अमानुष किळसवाणा प्रकार सुरू होता, त्या ठिकाणी अन्य महिलाही उपस्थित असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.


अंनिसची मागणी
महिलेला लग्न करून तिचं चित्रीकरण करून ते माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर अनिसने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे पदाधिकारी विनायक सावळे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हा प्रकार नेमका कुठे आणि केव्हा घडला आहे? कोणासोबत घडला आहे? याच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. 


अशा पद्धतीने महिलेला अमानुष वागणाऱ्या दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी देखील विनायक सावळे यांनी केली आहे. डाकीणची प्रथाही बंद व्हावी आणि याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यात यावी यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करण्याची मागणी देखील अंनिस कडून करण्यात आलेली आहे.


पोलिसांची भूमिका
महिलेला डाकीण ठरवून तिला विवस्त्र केल्यानंतर तिला चटके देण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलिस देखील सतर्क झाले आहेत. या व्हिडिओमधली बोलीभाषा ही सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये बोलली जात असल्याने हे व्हिडिओ आणि हा दुर्दैवी घटनाक्रम नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये घडला आहे का अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या भागातल्या सर्व पोलिस पाटलांना यासंदर्भात चौकशी करुन माहिती देण्याच्या सूचना धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी दिल्या आहेत. व्हिडिओतील संशयित आणि घटना जर धडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असेल तर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही औताडे यांनी स्पष्ट केलं आहे.


दुष्टचक्रातून केव्हा सुटका?
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आजही अशा पद्धतीने महिलांना डाकीण ठरवून त्यांचा छळ केला जात असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर त्या समाजातून शिक्षित होऊन पुढे समाजकार्यात लागलेल्या अनेक अधिकारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी या प्रथेविरोधात आवाज उचलला आणि जनजागृतीचे काम केलं. 


मात्र असं असतानाही शिक्षणाचे अपुरं प्रमाण आणि साधन सुविधांच्या अभावामुळे डाकीण प्रथेविरोधात अपेक्षित यश हे मिळाले नाही. आदिवासीबहुल या भागांमध्ये संसाधनांची कमतरता असल्यामुळे विकासाच्या संधी अपेक्षित मिळत नाहीत. त्यातच रोजगारासाठी भटकंती आणि अशा एक ना एक समस्यांमुळे कुप्रथांचा नायनाट ज्या गतीने होणे अपेक्षित आहे तो झालेला दिसून येत नाही. त्यामुळेच पुन्हा आता एका महिलेला डाकीण ठरवून तिला विवस्त्र करून अमानुष अत्याचार केल्याची ही घटना मन सुन्न करणारी आहे.