धक्कादायक! राज्यातल्या दंगली पूर्वनियोजित कारस्थान
महाराष्ट्र पोलिसांनी दंगलीचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे
अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती इथे 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेल्या दंगली या सुनियोजित कारस्थान होतं. या संशयाला आता बळकटी मिळाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी तसा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दंगलींची स्क्रिप्ट ही आधीच लिहिली गेली होती. पोलिसांच्या तपासात सोशल मीडियावरील 60 ते 70 पोस्ट समोर आल्या आहेत. या पोस्टमुळेच दंगली भडकल्याचा संशय आहे. यातील एक पोस्ट ही त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडल्याची फेक न्यूज सांगणारी आहे. त्यानंतर काही हजार पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड झाल्यात. गृह मंत्रालयाच्या अहवालात दंगलीला कारणीभूत ठरलेल्या 36 पोस्टचा उल्लेख आहे.
- पोलिसांच्या अहवालानुसार, 29 ऑक्टोबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेनं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवला.
- 1 नोव्हेंबरला जय संविधान या संघटनेनंही याच कारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
- 6 नोव्हेंबरला सरताज नावाच्या एका व्यक्तीचा ऑडिओ मेसेज व्हायरल झाला. यामध्ये तो त्रिपुरातील घटनेचा उल्लेख करून लोकांना एकत्र येण्यासाठी भडकवत होता.
- 7 ते 11 नोव्हेंबर या काळात रझा अकादमीनं राज्यव्यापी बंदची हाक दिली आणि सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल केले गेले.
- 12 तारखेला मालेगाव, अमरावती, नांदेडसह काही भागांमध्ये बळजबरीनं बंद करण्यात आला आणि त्यादरम्यान हिंसा झाली.
- त्याच दिवशी काही राजकीय नेत्यांनी दिवसभरातील हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल करून त्याविरोधात दुसऱ्या दिवशी बंद पुकारला.
या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. 12 आणि 13 नोव्हेंबरलाही अशाच अनेक पोस्ट जाणूनबुजून व्हायरल करून लोकांची माथी भडकवली गेलीयेत. आता कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मंत्रालय पोलिसांना कारवाईबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.