झी २४ तास : महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी : पोलीस `कोविड योद्धा` सन्मान आणि गौरव
`महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी` या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान `कोविड योद्धा` म्हणून `झी २४ तास`च्यीवतीने करण्यात आला.
मुंबई : कोरोना संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण राज्यातील पोलिसांनी केले. 'महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान 'कोविड योद्धा' म्हणून 'झी २४ तास'च्यीवतीने करण्यात आला. कर्तव्यदक्ष वर्दीला 'झी २४ तास'च्यावतीन सॅल्यूट करण्यात आला. विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आलेल्या 'कोविड योद्ध्यां' चा हा परिचय. ( क्लिक करा किंवा स्क्रोल करा आणि पाहा संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ )
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रमुख उपस्थित हा गौरव करण्यात आला. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी विभागातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा 'कोविड योद्धा' म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्वागत 'झी २४ तास'चे मुख्य संपादक आशिष जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी पोलिसांच्यावतीने मुंबईतील पोलीस निरीक्षक रमेश नागरे यांनी राज्यातील जनतेचे खास आभार मानले.
यावेळी राज्यातील शांततापूर्ण जिल्हे ( Most Peaceful Districts) म्हणून औरंगाबाद शहर, रत्नागिरी जिल्हा, नवी मुंबई शहर यांचा गौरव करण्यात आला. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक मोहित कुमार आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी हा गौरव स्विकारला.
राज्यातील हे आहेत 'कोविड योद्धा'
मंजुनाथ सिंगे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ८, मुंबई
फक्त पोलिसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या पुढाकारानं कालिनामध्ये कोविड सेंटर उभं राहिलं. कलिनामधल्या नव्यानं तयार झालेल्या पोलीस क्वार्टर्समध्ये हे कोविड सेंटर तयार झालं. पण या इमारतीमध्ये पाणी, वीज अशा कुठल्याही सुविधा नव्हत्या. आपल्या प्रयत्नांमुळे इमारतीला ओसीसह या सगळ्या सुविधा अवघ्या १० दिवसांत मिळू शकल्या. या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही आपल्याच पुढाकारानं झाली. आतापर्यंत या कोविड सेंटरमध्ये २ हजारांच्या वर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार झालेत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
संदीप मिटके, उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर
नगर शहरातले दिव्यांग, विधवा, अंध व्यक्ती, कामगार आणि गरजू व्यक्तींपर्यंत आपण लॉकडाऊनच्या काळात किराणा माल पोहोचवलात. तब्बल ७ लाख ३६ हजार २१२ अन्नधान्याच्या पाकिटांचं आपण वाटप केलं. एवढंच नव्हे तर मुक्या प्राण्यांना चारा पुरवण्याची जबाबदारीही निभावली. परप्रांतीय प्रवाशांना २१२ बसेस सोडून त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली. आपल्या पुढाकारानं दरबार चौकात एचडीएफसी बँकेचं एटीएमही बसवण्यात आलं. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
निवृत्ती बापूराव कोल्हटकर, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई
नवी मुंबईतल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित १५६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आपण योग्य ती काळजी घेतलीत. पोलीस कर्मचारी, मंत्रालयातले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा ४७०० जणांची तीन दिवसांत रॅपिड अँटिजेन टेस्ट करुन घेतलीत. कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवलं. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
अनिल डफळ, पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राईम
चिकन खाल्ल्यानं कोरोना होतो, या अफवा समाजमाध्यमांमध्ये पसरवल्या जात असताना त्या पोस्टच्या मुळापर्यंत आपण गेलात. ही अफवा पसरवणाऱ्याला थेट आँध्र प्रदेशात जाऊन अटक केलीत. तसंच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केलेत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
ए. पी. क्षीरसागर, पोलीस शिपाई, सांगली
कोरोना काळात रस्त्यावर पडलेल्या अपंग व्यक्तीला आपण आधार दिलात. स्वखर्चानं त्याला नवे कपडे देऊन अपंग व्यक्तीला मिरजमधल्या सेवाभावी संस्थेत पोहोचवलंत. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमांवर येताच प्रकरणाचा तातडीनं छडा लावलात आणि १३ जणांना अटक केलीत. आपल्या सतर्कतेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय
अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुणे
फोन पे या कंपनीतून बोलत असल्याचा बनावट फोन आल्यानंतर एका ग्राहकाची तब्बल दीड लाखांची फसवणूक झाली. पण आपल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आपण वेळीच बँकेशी पत्रव्यवहार करुन ग्राहकाचे दीड लाख परत मिळवून दिलेत. महाराष्ट्राची शान म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
तेजस्विनी सातपुते, पोलीस अधीक्षक, सातारा
साताऱ्यात कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचं हॉस्पिटल मिळावं म्हणून चैतन्य पोलीस ऑक्सिजन हॉस्पिटल निर्मितीसाठी आपण पुढाकार घेतलात. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हिटॅमिनच्या गोळ्या, मास्क मिळवून दिलेत. कोरोना काळात जनतेच्या मनातून भीती दूर करण्यासाठी आपण प्रभावी जनजागृती केलीत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
प्रिती शिंत्रे, पोलीस निरीक्षक, पुणे
कोरोनाग्रस्तांच्या प्लाझमा उपचार पद्धतीत आपण मोलाची भूमिका बजावलीत. वेबसाईटच्या माध्यमातून आपण ६३५ प्लाझमा दाते आणि ५७९ कोरोना रुग्णांचा संपर्क घडवून आणलात. आपल्या प्रयत्नांमुळे ३२५ गरजू रुग्णांना वेळेत प्लाझमा उपलब्ध झाला. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राईम मुंबई
कोरोना काळात वाढलेले गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी आपण महत्त्वाची भूमिका बजावलीत. खोटी आमिषं दाखवून लुबाडणाऱ्या आणि समाज माध्यमांमधून खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केलीत. ६४५ प्रकरणांची दखल घेऊन गुन्हे नोंदवलेत. महिला आणि बालकांविरोधातल्या गुन्ह्यांचाही तात्काळ छडा लावत ४८ आरोपींना अटक झाली. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती
काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना नियंत्रणात आणण्यात आपण अत्यंत मोलाची भूमिका बजावलीत. लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी, मालेगावात जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर मेसेजेसना आळा घालणं, कोरोना प्रतिबंध आणि धार्मिक सौहार्द कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी धर्मगुरूंशी बातचीत अशी महत्त्वाची कामगिरी आपण खुबीनं पार पाडलीत तसंच कोरोना आटोक्यात येताच कापड गिरण्या सुरू करण्यासाठीही आपण पुढाकार घेतलात. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय
प्रदीप शिवाजीराव काकडे, पोलीस निरीक्षक, नांदेड
कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या मृतदेहांवर आपण अंत्यसंस्कार केलेत. संपूर्ण कुटुंबालाच कोरोना झालेला असताना अंत्यसंस्कारावेळी कुणालाही हजर राहणं शक्य नसतं. अशा कुटुंबीयांच्या मदतीसाठी आपण पुढे आलात आणि आदरपूर्वक मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार केलेत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
चंद्रकांत बाळशिराम लांडगे, पोलीस निरीक्षक, मुंबई
जुलै महिन्यात प्रचंड पावसामुळे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये जमीन खचली. त्यावेळी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून एका वृद्ध महिलेची सुटका केलीत. तिला सुरक्षित स्थळी हलवलंत. अशा प्रकारे जोखीम उचलत २४ रहिवाशांची सुखरुप सुटका केलीत. महाराष्ट्राची शान म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
संतोष संपत तोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई
महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा सामना करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य पुरवण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर होती. पोलिसांना मास्क, फेसशिल्ड, व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर्स पुरवण्यात आपला महत्त्वाचा वाटा होता. विशेष म्हणजे सुट्टीही न घेता आपण आपली जबाबदारी चोख पार पाडलीत. आपल्याला जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाला हरवून आपण लगेचच पुन्हा कर्तव्यात रुजू झालात. पोलीस महासंचालक कार्यालय, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निवासस्थान निर्जंतुक करुन घेण्यामध्येही आपला मोठा वाटा होता. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
दर्शन सूर्यकांत सोनवणे, पोलीस शिपाई, नाशिक
कोरोना काळात नाशिकमधले पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचाऱी यांना आरोग्यविषयक साहित्य वाटपाची जबाबदारी आपल्यावर होती. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या गोगीवॉच या घड्याळाचं वाटप आपण केलंत. तसंच यासंदर्भातलं प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना दिलंत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
कुंडलिक कायगुडे, पोलीस निरीक्षक, मुंबई
कोरोनाकाळात वाहतूक अंमलदारांना १२ तास ड्युटी आणि ३६ तास ऑफ देऊन त्यांच्यावरचा ताण हलका करण्यात आपली महत्त्वाची भूमिका आहे. वाहतूक पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतलीत. कोरोनाबाधितांना आपण ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवून दिलीत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
हेमंत बावधनकर, पोलीस निरीक्षक, मुंबई
मुंबईतून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाला पाठवण्यासाठी २ लाख ६ हजार ३४३ ट्रेन्स रवाना झाल्या. मजुरांच्या गर्दीचे नियोजन, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शिस्तबद्ध आखणी करत आपण महत्त्वाची भूमिका पार पाडलीत. एकही अनुचित प्रकार किंवा एकही गुन्हा घडला नाही. या कामात मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना होणार नाही, याचीही खबरदारी आपण घेतलीत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
डॉ. बाळसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, सायबर क्राईम, मुंबई
कोरोना काळात अफवा पसरवणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात आपण धडक मोहीम उघडलीत. ६४५ प्रकरणांत आपण गुन्हे दाखल केलेत, तर ३०३ आरोपींना अटकही केलीत. समाजमाध्यांवर करडी नजर ठेवत आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची खबरदारी घेतलीत. क्राईम कॅम्पेन ही जनजागृतीची मोहीम यशस्वीपणे राबवली. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
रमेश बाबुराव नागरे, पोलीस निरीक्षक, मुंबई
कोरोनाचा एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये आपण तैनात होतात. लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी, नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचं वाटप, अन्नधान्य वाटप यामध्ये आपण मोलाची भूमिका बजावलीत. धारावीच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरून आपण कोरोनाबाबतीत जनजागृती केलीत. धारावीतलं कोरोना संक्रमण आटोक्यात येण्यात आपला महत्त्वाचा वाटा आहे. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
प्रसाद मनोहर औटी, पोलीस नाईक, सोलापूर ग्रामीण
आषाढी वारीची परंपरा कोरोनामुळे यंदा खंडित झाली. वारकरी वेष करुन आपण वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचं आवाहन केलंत. यंदाची वारी घरच्या घरी साजरी करण्यासाठी वारकऱ्यांना प्रोत्साहन दिलंत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
राजेंद्र चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर
नागपूरमधल्या बुटीबोरी, एमआयडीसी भागात आपण पुढाकार घेऊन वेळोवेळी रोडमार्च काढलात. कोरोनासंदर्भात नागरिकांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केलीत. जवळपास पाचशे स्थलांतरीत मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलीत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून विशेष खबरदारी घेतलीत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
सुधाकर देढे, पोलीस निरीक्षक, गडचिरोली
कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे रोजगार गेले. असे अनेक कामगार, भिकारी, वंचितांची उपासमार होत होती. त्यांच्या मदतीला आपण धावून गेलात. अशा शेकडो लोकांची आपण जेवणाची सोय करुन दिलीत. तसंच अशा कुटुंबीयांना तांदूळाचं वाटपही केलंत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
त्रिशिला गावंड, पोलीस नाईक
कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, दोन वेळचं खायचंही मिळेना... अशा लोकांना आपण आधार दिलात. त्यांच्या मदतीसाठी पुढे आलात. अशा गरजू लोकांना जेवण मिळेल, याची खबरदारी आपण घेतलीत. तसंच त्यांना अन्नधान्य वाटपही केलंय. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
प्रशांत घागी, पोलीस नाईक, गडचिरोली
कोरोना काळात कर्तव्य बजावण्यासाठी एसआरपीएफच्या विविध कंपन्या गडचिरोलीमध्ये तैनात होत्या. त्या ९५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आपण केलीत. तसंच त्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारीही घेतलीत. अधीक्षक कार्यालय आणि परिसर सॅनिटाईज करण्याचं कर्तव्यही आपण चोख बजावलंत. कोविडयोद्धा म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.
शरद आसाराम झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम
परदेशातून आंतरराष्ट्रीय VOIP कॉल्स हे अनधिकृतपणे भारतातल्या सिमबॉक्सवरुन केले जात होते. देशविरोधी कायवाया करण्याचा या गुन्हेगारांचा हेतू होता. याची माहिती मिळताच आपल्या पथकानं तातडीनं याचा छडा लावला. या कारवाईसाठी आपण बेस्ट डिटेक्शन ऑफ मंथ बक्षीसही मिळवलंत. महाराष्ट्राची शान म्हणून आपला गौरव करताना 'झी २४ तास'ला अभिमान वाटतोय.