Maharashtra Politics : राज्यातील काँग्रेस (Congress) पक्षात गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरुन (nashik graduate constituency election) सुरु झालेल्या नाट्यमय घडामोडींवरुन सध्या मोठं राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विजयी उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे आपल्या परिवारावर निशाणा साधला जात असल्याचा आरोप केला होता. यासोबत आजी माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये नवा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्यातील वाद अत्यंत विकोपाला गेल्याची सध्या चर्चा सुरु  आहे. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे म्हटले जात आहे. नाना पटोले यांनी याबाबत बोलताना मला या पत्राबद्दल माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.


"माझं बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काहीच बोलणं झालं नाही. तुम्ही त्यांच्यासोबत बोललात तर जास्त खुलासा होईल. त्यांनी लिहिलेलं पत्र मिळालं तर मी त्याबाबत बोलू शकेल. जनतेच्या मूळ प्रश्नांकडे कॉंग्रेसचे लक्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे पत्र तुमच्याकडे असेल तर प्रतिक्रिया देता येईल. बाळासाहेब थोरात यांनी असे पत्र लिहिलं असेल असे मला वाटत नाही," असे नाना पटोले म्हणाले.


नाना पटोलेंच्या विरोधात राज्यात बंड?


दुसरीकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात बंडाची तयारी सुरु असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांकडून दिल्ली हायकमांडकडे तक्रारी केल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विदर्भात काही कॉंग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात दिल्ली हायकमांडकडे तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत नागपूरच्या विजयाचे श्रेय नाना पटोले घेत असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.