...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात रविवार मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) फक्त एका तासात विरोधी पक्षनेता पदावरुन थेट उपमुख्यमंत्री झाला आहेत. रविवारी सकाळी इतक्या वेगाने घटना घडल्या की कोणाला काही कळायच्या आधीच अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले होते. विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात अनेकांना याची कल्पनाच नव्हती. अजित पवार बैठकीनंतर समर्थक आमदारांसह राजभवानात दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह धर्मराव अत्रम, सुनील वलसाडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, आदिती सुनील तटकरे यांनीही शपथ घेतली. शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्व मंत्री उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे, शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे प्रफुल्ल पटेलही राजभवनात उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकरणात आजचा रविवार कायमचा नोंदला जाईल. सकाळी लोकांना कळण्याआधीच अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनासाठी निघाले होते. सर्वात आधी अजित पवारांनी समर्थक आमदारांसह आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. यानंतर 17 आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी राजभवनासाठी निघाले. अजित पवार पोहोचले तेव्हा राजभवनात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरजण पोहोचले होते.
अजित पवारांनी घेतलेल्या या बैठकीत सुप्रिया सुळेही सहभागी झाल्याची माहिती आहे. मात्र त्या मधेच बैठक सोडून निघून गेल्या होत्या. यादरम्यान, सकाळी जयंत पाटील यांनी फोनवरुन शरद पवार यांच्याशी चर्चा केली. राजकीय घटनाक्रम पाहता शरद पवार पुण्यातच थांबले होते. त्यांनी आपले सर्व कार्यक्रमही रद्द केले.
सकाळी नेमकं काय घडलं?
आज सकाळी 11 वाजल्यापासूनच राज्यात वेगवान घडामोडी सुरु झाल्या होत्या. सर्वात आधी अजित पवारांचे पीए राजभवनात दाखल झाले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसही सागर बंगल्यावरुन राजभवनासाठी निघाले. यामुळे एकच चर्चा सुरु झाली होती. काही वेळातच छगन भुजबळ आणि राष्ट्रावादीचे इतर आमदार पोहोचल्यानंतर चित्र स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचल्यानंतर सर्वात शेवटी अजित पवार दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांचा शपथविधी यावेळी पार पडला.
अजित पवार नाराज का?
शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार वगळता सर्वांनीच त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षांतर्गत विरोधानंतर निर्णय़ मागे घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. तसंच आपल्याला प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा असल्याचं सूचक विधान केलं होतं. यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.