Maharashtra Political Crisis: आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) कोसळणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होणार याबाबत सत्ताधारी आणि विरोधक तर्क-वितर्क लढवत आहेत. पण नेमका निकाल काय असेल यासाठी 11 वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. पण मला वाटतं ते विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण सोपवतील. ही शक्यता नाकारता येत नाही. विधीमंडळातील बाब असल्याने ते विधानसभा अध्यक्षांनाच याची माहिती घेत निर्णय घेण्यास सांगतील," अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली आहे. तसंच 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर बोलण्यास नकार दिला आहे. निकाल आल्यावर आपण बोलू असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला. 


आज रात्री उद्धव ठाकरे शांत झोपतील - मंगेश चव्हाण


सत्ता संघर्षाचा निकाल हा साधा निकाल असून त्यात कुठेही संघर्ष नाही. जेव्हा विरोधकांच्या हातात होतं त्यावेळी त्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही. विरोधक त्यांच्या स्वप्नांपासून खूप लांब गेले असून न्यायालयाचा निर्णय काहीही आला तरी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील असं मत भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना मुंगेरीलाल की हसीन सपने पाहायची सवय झाली असून त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरे शांत झोपतील अशी टीकादेखील आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.


सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार - भरत गोगावले 


सुप्रीम कोर्टात आम्ही मेरिटवर उजवे आहोत. त्यामुळे आज येणारा निकाल आमच्याच बाजूने असेल असा ठाम विश्वास शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. या निकालानंतर आम्हाला कुठल्या पक्षात जाण्याची किंवा कुणाला सोबत घेण्याची वेळ येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


सुप्रीम कोर्ट आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्क वितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार? यासह बंड करणाऱ्या इतर आमदारांचं काय होणार? सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना निलंबित करणार की विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्यास पाठवणार? राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार?  निर्णय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज ११ वाजता मिळणार आहेत.