Maharashtra Political Crisis : राज्याचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणी प्रशांत पाटील नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलंय. पाटील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याने महाडमधून ही धमकी दिली होती. दारूच्या नशेत धमकी दिल्याचं समजतंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ सातत्यानं राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत होते. सोमवारी ते पुण्यात होते तिथंही त्यांचा असाच काहीसा पवित्रा पाहायला मिळाला होता. दरम्यान, भुजबळ यांना धमकी देताना आपल्याला सुपारी मिळाल्याचं प्रशांत पाटील म्हणाला होता. पण, आपण हे दारुच्या नशेत केल्याची कबुली त्यानं दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील तपास करताना दिसत आहेत. 


सोमवारी फोन आला आणि.... 


"मी तुमच्या नावाची सुपारी घेतली असून उद्याच तुमचं बरं वाईट करणार आहे" अशी धमकी देणारा एक फोन छगन भुजबळांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर आला होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही धमकी आली. मंत्री छगन भुजबळ हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी होता. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर प्रशांत पाटील नावाच्या तरुणाचा फोन आला. त्याने मी तुमची सुपारी घेतली असून उद्या तुमचे बरे वाईट करणार आहे अशी धमकीच थेट छगन भुजबळ यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्य ओळखत तपास केला. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि ही कृती केल्याची माहिती समोर येत आहे. 


हेसुद्धा वाचा : देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...



 


शरद पवार यांच्याविषयी काय म्हणाले भुजबळ? 


रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी तीव्र नाराजीचा सूर आळवला. इतक्यावरच न थांबता भाजप आणि मुंडे कुटुंबात फूट पाडण्यासाठीही पवारांनाच दोषी ठरवलं. 'पावसात आम्हीसुद्धा भिजत असतो. शरद पवार यांचे वय आहे, आजारपण आहे त्यामुळे सहानुभूती निर्माण होत असते. आम्ही पावसात भिजत नाही असे काही नाही. शिवसेनेत असताना आम्ही तीन ते चार वाजेपर्यंत बैठक घ्यायचो. प्रचंड पावसामध्ये आम्हीसुद्धा बैठका घेतल्या होत्या. हा काही नवीन भाग नाही', असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्याविषयीच्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 


यापूर्वी ‘सरस्वती’ वरील वक्तव्यामुळंही ते अनेकांच्या निशाण्यावर होते. त्यावेळीही अशीच काहीशी परिस्थिती ओढावल्याचं पाहायला मिळालं होतं.