Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, `हे` खातंही हिसकावलं
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.
Maharashtra Portfolio : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड केलं आणि शिंदे-फडणवीस सरकारबरोबर (Shinde-Fadanvis Government) वेगळी चूल मांडली. 2 जुलैला अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर गेल्या बारा दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावरुन खलबतं सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील वादामुळे खातेवाटप लांबणीवर पडत असल्याचं बोललं जातं होतं. अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला. खातेवाटपाची (Minister Portfolio) यादी राज्यपालांकडे गेली आणि त्यावर त्यांची सही झाली. त्यानंतर खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ (Finance) खातं देण्यास शिंदे गटाचा विरोध असल्याचं बोललं जात होतं. ज्या कारणासाठी शिवसेना शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला, तेच खातं अजित पवार यांना मिळालं. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेटले. या भेटीनंतर अजित पवार अर्थ खातं मिळवण्यात यशस्वी ठरले. इतकंच काय तर शिंदे गटाकडचं कृषी खातंही राष्ट्रवादीने घेतलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडचं कृषी खातं धनंजय मुंडे यांना देण्यात आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर त्यांना परिवहन खाते मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे
अजित पवार - अर्थ आणि नियोजन
दिलीप वळसे पाटील - सहकार
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य
छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
आदिती तटकरे - महिला व बालविकास
धनंजय मुंडे - कृषी
धर्मरावबाबा आत्राम- औषध व प्रशासन
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
अमित शहांच्या भेटीनंतर तोडगा
अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी रात्री दिल्लीत अमित शाहांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. य बैठकीत राष्ट्रवादीला हवी असलेली खाती आणि राष्ट्रवादीला देता येतील अशी खाती यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या भेटीनंतर दोन दिवसातच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. तसंच विधानपरिषदेतल्या 12 जागांमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाने वाटा मागितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य न्यायालयीन लढ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.