`कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला`; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गाव भेटी करत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अजब दावा केला आहे. कोविड व्हॅक्सिन घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे त्यांनी लोकाना जबरदस्ती केली, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेनी भेट देत लोकांशी संवाद साधला. याचं दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदीवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदेनी सीरम व्हॅक्सीन संदर्भात धक्कादायक विधान केलं.
"सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले. आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली," असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
"आपल्याला ज्या कंपनीचे जबरदस्तीने व्हॅक्सिन दिले त्या कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला मारण्यासाठी, टेन्शन नका घेऊ पण आपल्याला व्हॅक्सिन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली," असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
"तुम्हाला त्या व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू झाले आहे. ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झाले. मी तर व्हॅक्सिन घेतलंचं नाही. मी खरेच व्हॅक्सिन घेतले नाही, मोदींचे फोटो असताना मी कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
राहुल गांधींचाही गंभीर आरोप
"करोनात किमान 50 लाख लोकांचा मृत्यू झाला. करोनामध्ये भारतात मृतदेहांचे खच पडत असताना लस बनवणारी कंपनी नरेंद्र मोदींना पैसे देत होती. एकीकडे मृतदेह आणि दुसरीकडे लस बनवणारी कंपनी सिरम इन्सिट्यूट थेट नरेंद्र मोदींच्या पक्षाला करोडो रुपये देत होती. नरेंद्र मोदी तुम्हाला थाळी वाजवा, फोनची फ्लॅशलाइट लावा सांगत होते. तुम्ही थाळी वाजवत असताना पूनावाला तुमच्या खिशातून पैसे काढत भाजपाला देत होते. करोनात तुमचे पैसे चोरले," असा आरोप राहुल गांधींनी केला.