Maharashtra Politics : 2019 ते 2024 या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी उलथापालथ झाली जी एवढ्या वर्षता कधीच झाली नाही. चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रानं राष्ट्रपती राजवट पाहिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे तीन-तीन मुख्यमंत्री पाहिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बदलत राहिले, मात्र उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार मात्र कायम राहिले. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती करून लढवली. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून युतीत फाटाफूट झाली. अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही, असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले.


महाराष्ट्रात पहिला भूकंप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या... तीन पक्षांची बोलणी सुरू असतानाच, महाराष्ट्रात पहिला राजकीय भूकंप घडला... 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटे महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. आणि भल्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शपथविधी राज भवनावर पार पडला. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी पाठिंबा न दिल्यानं अजितदादांचं हे बंड फसलं... फडणवीस-अजितदादांचं हे सरकार केवळ अडीच दिवस टिकलं...


उद्धव ठाकरेंचं मविआ सरकार


त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली.  28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली. यावेळीही उपमुख्यमंत्री होते अजित पवारच.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कोरोनाची लाट आली. त्यामुळं या सरकारला विशेष कामगिरी बजावता आली नाही.


शिवसेनेत फूट, शिंदे मुख्यमंत्री


2022 मध्ये राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मविआची मतं फुटली आणि शिवसेनेतही उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे 40 आमदार फुटून सूरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं... आणि भाजपच्या पाठिंब्यावर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


राष्ट्रवादीही फुटली, सरकारमध्ये तिसरं इंजिन


शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. शरद पवारांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युती सरकारमध्ये अजित पवार समर्थक राष्ट्रवादी आमदार सामील झाले आणि महायुती सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलं. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले.


शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचं प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं.  शिवसेना शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेच्या हाती सोपवलं. तर अजित पवारांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगत, निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या हातावर बांधलं.


मात्र राजकीय पक्षांमधील हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला फारसं रुचलेलं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. लोकसभेच्या 48 पैकी तब्बल 31 जागा जिंकून महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला जोर का झटका दिला. आता ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट रणसंग्राम होणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये अस्तित्वात येणारी पंधरावी विधानसभा आता काय नवा राजकीय इतिहास घडवतं, ते पाहायचं.