ताईंविरोधात दादा उतरणार प्रचारात, अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीत करायचंय?
भाजपनं जे अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीतही भाजपला करायचंय यासाठी रणनीती आखली जातेय..त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरले तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?
Maharashtra Politics : 1991 पासून बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबाचं एकहाती वर्चस्व आहे. शरद पवार (Sharad Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Constituency) 5 वेळा तर सुप्रिया सुळे (Supriya Sule) 3 वेळा निवडून आल्यात. मोदी लाटेतही सुप्रिया सुळे बारामतीतून विक्रमी मतांनी निवडून आल्या. आता मात्र बारामती जिंकणं सुप्रिया सुळेंसाठी सोपं नसल्याची चर्चा आहे. कारण ताईंचे थोरले भाऊ अजित पवार (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरणार आहेत. दादांची लोकप्रियता, त्यांची प्रतिमा, त्यांनी केलेली विकासकामं या जोरावर बारामतीचं मैदान मारण्याचा भाजपचा मनसुबा आहे. बारामतीत महाविजयाचा संकल्पच भाजपनं केलाय..
सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीत अजितदादा प्रचार करणार याला हसन मुश्रीफांनीही दुजोरा दिलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनीही सूचक विधान केलं होतं. पुण्याचं पालकमंत्रीपद सोडणं म्हणजे छोट्या कामासाठी केलेली छोटी तडजोड आहे असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. बारामती जिंकायचीच असा चंग भाजपनं का बांधलाय.
बारामतीची लढाई प्रतिष्ठेची का?
1991 पासून बारामतीवर पवार कुटुंबाचं एकहाती वर्चस्व आहे. शरद पवार बारामतीतून 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. तर सुप्रिया सुळे बारामतीतून 3 वेळा खासदार बनल्यात. जर बारामतीमध्ये पवारांना हरवलं किंवा कांटे की टक्कर झाली तर राष्ट्रवादीच्या मुळावरच आघात केल्यासारखं होईल. बारामतीतली हार शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंच्या राजकारणावर थेट परिणाम करणारी ठरु शकते. त्यामुळेच सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवारांना प्रचारात उतरवून बारामतीची सीट पक्की करण्याचा भाजपचा इरादा आहे
मोदी लाटेतही बारामतीचा गड सर करता आला नव्हता. त्यामुळेच भाजपच्या मिशन 45+ साठी एकेक जागा महत्त्वाची आहे. 2009 पासून सुप्रिया सुळे बारामतीचं नेतृत्व करतायत. मोदी लाटेतही भाजपला हा गड सर करता आलेला नाही. आता मात्र अजित पवार भाजपसोबत आहेत. दादांची बारामतीत चांगलीच ताकद आहे. त्यामुळे स्वत: अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात प्रचारात उतरले तर ती सुळेंसाठी डोकेदुखी ठरु शकते..