`शिवाजी महाराज कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? बिल्किस बानो की..`; आव्हाडांचा भाजपाला सवाल
Maharashtra Politics Ashish Shelar Vs Jitendra Awhad: रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करा असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
Maharashtra Politics Ashish Shelar Vs Jitendra Awhad: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरुन भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सोशल मीडियावर बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी रायगडमध्ये बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख केल्याने आशिष शेलार यांनी खोचकपणे त्यांच्यावर टीका केली. मात्र या टीकेला उत्तर देताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज असते तर कोणाच्या बाजूने उभे राहिले असते असा सवाल उपस्थित केला. तसेच 'इतकी खालची पातळी महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीच गाठली नव्हती,' असंही आव्हाड म्हणाले.
नेमकं शेलार काय म्हणाले?
आशिष शेलार यांनी गुरुवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सोशल मीडियावरुन निशाणा साधला. "श्रीमान उद्धव ठाकरे आज काय बिलकिस बानो प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेताय? की पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा, दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (JuD) आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक भुट्टावी याचा मृत्यू झाला त्याबद्दल श्रध्दांजली अर्पण करताय? किंवा काल विकासाचा महासेतू खुला झाला त्यावर मळमळ, जळजळ व्यक्त करताय?" असा टोला शेलार यांनी लगावला. "बोला, आम्ही पण आज बोलणार आहोतच," असंही शेलार यांनी म्हटलं.
रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा
रायगडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर आशिष शेलार यांनी पुन्हा ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच. रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करुन.. बघून या!" असा टोला शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या बाजूने उभे राहिले असते?
आशिष शेलार यांच्या याच ट्वीटवरुन जितेंद्र आव्हाड यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास आव्हाड यांनी ट्वीटरवरुन आशिष शेलार यांचं ट्वीट कोट करत प्रतिक्रिया नोंदवली. "बिल्किस बानोची बाजू घेऊन बोलल्याबद्दल भाजप नेते ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, ते बघता इतकी खालची पातळी महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीच गाठली नव्हती," अशी टीका आव्हाड यांनी केली. तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी, "ज्यांना आपल्या महाराष्ट्र धर्माचा इतिहास आणि तत्त्व माहित आहेत अशा महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर ते कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? जिच्यावर सामूहिक बलात्कार करून मुलांची आणि कुटुंबियांची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली,अशा स्त्रीच्या बाजूने... की? मतांच्या राजकारणासाठी ज्यांनी बलात्कार आणि खून करणा-या गुन्हेगारांची सुटका व्हावी यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून राज्य आणि केंद्रीय यंत्रणांवर दबाव आणला अश्या लोकांच्या बाजूने...?" असा सवाल उपस्थित केला.
आता आव्हाड यांच्या या टीकेला शेलार काय उत्तर देतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.