कल्याणमध्ये तणाव! शिवसेनेच्या उपशहर प्रमुखावर हल्ला, शिंदे समर्थकांवर आरोप
एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी तलवार आणि रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे समर्थक असून त्यांनी शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
तर महेश गायकवाड यांनी मात्र आरोपांचं खंडन केलं असून हल्ला झाला हे दुर्दैवी मात्र माझा काडीमात्र संबंध नाही असं म्हटलं आहे. पोलिसांनी तपास करत कारवाई करावी, माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करू असा इशाराही दिला आहे. दरम्यान घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत
हर्षवर्धन पालांडे यांचा आरोप
आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडिल संतोषी माता रोड परिसरात कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तीन ते चार जणांनी तलवार आणि रॉड ने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसानी तपास सुरू केला आहे. सकाळी कामावर जात असताना अचानक तीन ते चार इसमाने त्यांची गाडी अडवली आणि तलवार रॉडने माझ्यावर हल्ला केल्याचं पालांडे यांनी म्हटलं आहे. हल्लेखोर शिवसेनेत जास्त उडतोस असं धमकावत असल्याचा आरोप देखील पालांडे यांनी केलाय . हे हल्लेखोर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे साथीदार असून शिवसेनेत जास्त उडू नकोस अशी धमकी देत मारहाण करण्यात आल्याचा आरोप पालांडे यांनी केलाय
महेश गायकवाड यांच्याकडून आरोपांचं खंडन
तर महेश गायकवाड यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. पोलिसांनी तपास करत कारवाई करावी ,माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.