राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा `हा` मोठा नेता `तुतारी` हाती घेणार?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील भाजपला (BJP) राम राम करून हाती घेणार तुतारी घेण्याची शक्यता आहे.
स्टेटसवर ठेवली तुतारी
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटील यांनी आपल्या मोबाईलवर तुतारीचा स्टेट्स ठेवला आहे. राजवर्धन पाटील यांनी आपल्या मोबाईलवर शरदचंद्र पवार गटाची तुतारीचा स्टेटस ठेवल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार अशी चर्चा सुरु होती. आता राजवर्धन पाटील यांनी स्टेटस ठेवल्याने हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
इंदापूरची जागा अजित पवार गटाला?
इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. या जागेवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील इच्छूक आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांना 2019 मध्ये तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेसला रामराम करत हर्षवर्षन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. गेल्या वर्षी राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सामील झाला. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे देखील अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीतून ही जागा कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
पण अजित पवार यांनी इंदापूरची जागेवर दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देणार असल्याचं संकेत दिल्याने हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.