कसब्यात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनिती फसली
कसबा पोटनिवडणूक भाजपसह विशेष करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची होती. निवडणूक जिंकण्यासाठी फडणवीसांनी स्वत: इथे तळ ठोकला होता. पण यानंतरही भाजपाला मोठा धक्का बसला
Kasba Bypoll Election Result: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) भाजपचा (BJP) बालेकिल्ला उद्ध्वस्त झालाय. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) तब्बल 11 हजार मतांच्या फरकानं भाजपच्या हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) दारूण पराभव केला. भाजपचं वर्चस्व असलेल्या कसब्याच्या गडाला 28 वर्षांनी काँग्रेसनं सुरुंग लावला. भाजप आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadhi) या दोघांनीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची पोटनिवडणूक होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसाठी ही निवडणक महत्वाची होती.
प्रचारासाठी दिग्गजांची फौज
भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचाराच्या मैदानात दिग्गजांची फौज उतरवली होती. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह भाजपचे बडे नेते मैदानात उतरले होते. कॉर्नर मीटिंग, रोड शो घेतले. विधानपरिषद निवडणुकीत नागपूर आणि अमरावतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक भाजपला विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थिती जिंकणं गरजेचं होतं. आजारी असतानाही स्थानिक खासदार गिरीश बापट यांना (Girish Bapat) नाकाला ऑक्सिजनची नळी आणि हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून प्रचारात उतरवण्यात आलं.
देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्यनिती फेल
कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वत: तळ ठोकून होते. पुण्यातील मानाचे पाच गणपती हे कसबा विधानसभा मतदारसंघात येतात. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व गणपती मंडळांच्या अध्यक्षांची भेट घेतली. तसंच पुण्यातील बड्या उद्योगपतींसोबत बैठका घेतल्या. यात उद्योगपती पुनीत बालन, फत्तेचंद रांका यांचाही समावेश होता. त्यानंतर प्रचारसभा आणि रॅलीही घेतल्या. ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत, या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मतांचं धृवीकरण केलं जात असल्याचा आरोप करत फडणवीसांनी डाव टाकला. पण कसब्यात फडणवीसांची चाणाक्यनिती चालली नाही. ब्राह्मण समाजाची नाराजी, अँन्टीइन्मबन्सीचा फटका, गिरीश बापटांची अनुपस्थिती या सगळ्यामुळे भाजपला कसब्यात जोरदार फटका बसला.
भाजपचा बालेकिल्ला का ढासळला?
मविआनं चार टर्म नगरसेवक असलेल्या धंगेकरांच्या रुपानं जनतेशी नाळ असलेला उमेदवार दिला. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवारासाठी महाविकास आघाडीचे नेते एकजुटीनं प्रचारात उतरले. याउलट भाजपनं टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारून सहानुभूती गमावली. कसब्याच्या पेठांमधील ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवल्याचं बोललं जातंय.. बापटांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना प्रचारात उतरवलं, ही बाब अनेकांना खटकली. प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका भाजपला बसला
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरची ही दुसरी पोटनिवडणूक. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारानं माघार घेतल्यानं ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंनी एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र कसब्यात चुरशीची निवडणूक झाली. भाजप आणि मविआसाठी देखील ती प्रतिष्ठेची बनली होती. त्यात भाजपचा पराभव झाल्यानं राज्यातील सरकारविरोधातील कौल म्हणूनही कसब्याच्या निकालाकडं पाहिलं जातंय. सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातोय.