Ajit Pawar on Supriya Sule : बारामती लोकसभा निवडणुकीवरुन गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. निवडणुकीवरुन बहिण–भावामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. अजित पवार हे सध्या बारामती मतदारसंघात जाऊन माझ्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करत आहेत. अशातच सुप्रिया सुळेंच्या एका भावनिक व्हिडीओवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी दिग्दर्शक-गायक अवधूत गुप्ते यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अवधूत गुप्तेंनी अजित पवारांना ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सुप्रिया सुळे भावुक झालेल्याचा जुना व्हिडीओ दाखवला. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.


गेल्या वर्षी अवधूत गुप्ते यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंना अजित पवारांबरोबरचे काही फोटो एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या व्हिडीओला  ‘एक हजारों में मेरी बहना है’ हे गाणं जोडलं होतं. अजित पवारांबरोबरच्या फोटोंचा व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे कॅमेऱ्यासमोरच रडू लागल्या होत्या. हाच व्हिडीओ पुन्हा अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांना पुन्हा दाखवला. यावर अजित पवारांनी पक्ष फुटीनंतर घरातल्या परिस्थितीबाबत भाष्य केलं.


काय म्हणाले अजित पवार?


"आज माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. पण, प्रत्येकाची राजकीय भूमिका आणि घरगुती नातेसंबंध वेगळे असतात. तुम्ही पहिल्यापासून आमच्या घरामध्ये पाहिलंत, तर आमचं संपूर्ण घराणं हे शेतकरी कामगार पक्षाचं होतं. त्यावेळी आमचे स्वर्गीय वसंतदादा पवार त्या पक्षाचे लीडर होते आणि त्यांना तिकीट सुद्धा मिळालं होतं. संपूर्ण घर शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना पवार साहेब फक्त काँग्रेसचं काम करत होते. कारण, त्यांना ती विचारधारा पटलेली होती. त्यामुळे आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे," असे अजित पवारांनी स्पष्ट केलं.


"मी इतके वर्ष वडिलधाऱ्यांचा आदर करत आलोय आणि इथून पुढेही करणार आणि तिच महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही काही वेगळं केलंय अशातला भाग अजिबात नाही. अनेकजण आम्हाला म्हणतात तुम्ही भाजपाबरोबर कसे काय जाऊ शकता? त्यांना एवढंच सांगेन आम्ही कधीकाळी शिवसेनेबरोबर देखील गेलो होतो. पाठीमागच्या आठवणी या वेगवेगळ्या आणि त्या-त्या काळातल्या आहेत. परंतु, आताचा काळ पूर्णपणे बदलला आहे. आता खूप पाणी वाहून गेलंय आणि बरेच जण अलीकडच्या काळात निर्ढावलेले आहेत," असं अजित पवार म्हणाले.