`मला काही सांगायचं`... `50 खोके एकदम ओके`... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंक
maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी एखाद्या चित्रपट किंवा नाटकाहून अधिक रोचक होत्या. महाराष्ट्रातील सत्तांतर, एकनाथ शिंदे यांची त्यात असलेली मध्यवर्ती भूमिका आणि सत्तांतरानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप, एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा स्वरूपाच्या नाट्यमय घटना राज्याने पाहिल्या आहेत. त्याचाच प्रत्यय आता रंगभूमीवर देखील दिसणार असून येऊ घातलेल्या 2 नव्या नाटकांमुळे महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचा तिसरा अंक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
CM Shinde On Mala Kahi Sanagaychay : एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर शिवसेनेची दोन शकलं झाली. तेव्हापासून आजतागायत शिंदेंच्या बंडाबाबत अनेक कहाण्या ऐकू येतात. मात्र, आता याच सत्तासंघर्षाची कहाणी रंगभूमीवरसुद्धा पाहायला मिळणार आहे.. 'मला काही सांगायचंय' या दीर्घांकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना नेमकं काय सांगायचं आहे ते प्रेक्षकांना रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. धर्मवीर चित्रपटातूनदेखील अनेक राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न झाला होता. धर्मवीर रिलीज झाला आणि काही आठवड्यातच शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. त्यामुळे आता 'मला काही सांगायचंय' या नाटकानंतर नेमक्या काय घडामोडी होणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडावर हे नाटक येतंय...तर दुसरीकडे 50 खोके एकदम ओके या शीर्षकाचं दुसरं नाटकही रंगभूमीवर ऑक्टोबर महिन्यात दाखल होणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पाहायला मिळाला.. आता हाच राजकीय संघर्ष या दोन नाटकांच्या निमित्ताने रंगमंचावरही पाहायला मिळेल.. तर यावरून शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार टीका केलीय.
महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या राजकीय बंडाच्या पार्श्वभूमीवर "मला काही सांगायचं" आणि दुसऱ्या बाजूला 50 खोके एकदम ओके अशा दोन नाटकांची एन्ट्री रंगमंचावर एकाच वेळी होणार आहे.. आता यातून नेमकं कुणाला काय सांगायचं आहे हे नाटक पाहिल्यानंतरच समजू शकेल..
या कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील का ? नाटक आणि दिर्घांकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि प्रहसनाच्या माध्यमातून पन्नास खोके एकदम ओकेचं सादरीकरण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं आहे.