Maharashtra Politics : शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. एका खासदाराने माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या खासदाराला निवडूण आणण्यासाठी जीवाचे रान केले असे अजित पवार यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच असा इशार अजित पवारांनी दिली आहे. त्यावर आता अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अजित पवार हे खूप मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी सर्वसामान्य कार्यकर्त्याने बोलणं उचित ठरणार नाही. मधल्या काळात अजित पवारांनी भूमिका बदलली आहे. 2 जुलैच्या आधीपर्यंत त्यांनी भूमिका बदलली नव्हती तेव्हा त्यांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता. जर या गोष्टी खटकत होत्या तर त्याचवेळी कान धरला असता तर बरं झालं असतं. पहिल्याच टर्ममध्ये जेव्हा दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला, संसदेतल्या भाषणासाठी दादांनीच पाठ थोपटली. शिवस्वराज्य यात्रा केली तेव्हासुद्धा अजित पवार सोबत होते. विधानसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनी हे पाहिलं आहे. त्यावेळी पाठीवर हात ठेवून शाबासकीची थाप दिली. आज जर त्यांनी विरोधात वक्तव्य केलं तर लगेच मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही," असे अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.


"खासगीतल्या गोष्टींना काही संकेत असतात. मग त्यांची कारणमीमांसासुद्धा लोकांना सांगावी लागेल. इतक्या मोठ्या नेत्यासोबत खासगीत केलेल्या गोष्टी लोकांमध्ये सांगायला लागलो तर ते संकेतांना धरुन होणार नाही. त्यामुळे अजित पवारांविषयी मी भाष्य करणार नाही. परिस्थिती बदलली म्हणून खोटे बोलणे माझ्या तत्वात बसत नाही. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली हे खरेच आहे. अजितदादा मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलायला मी फार लहान कार्यकर्ता आहे. ना मी राजकारणातला आहे, ना माझी राजकीय पार्श्वभूमी आहे. ना माझा कारखाना आहे, ना कुठली शिक्षणसंस्था आहे. त्यामुळे अशा मोठ्या नेत्यांनी बोलणे आणि त्यावर मी माझी प्रतिक्रिया देणे हे बातम्यांमध्ये येण्यासाठी मला पटत नाही.मला जी जबाबदारी दिलीय ती पार पाडणे महत्त्वाचे आहे. यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वात शिरूर मतदारसंघाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे दादांबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया द्यावी हे पटत नाही," असेही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले अजित पवार?


"निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यामुळे पदयात्रा सुरु आहेत. कुणाला संघर्षयात्रा सुचते तर कुणाला पदयात्रा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सहा तालुक्यांमध्ये सांगतो कशी यांची भूमिका होती आणि गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपल्या मतदारसंघात पाहिलं आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच तू ढेपाळला आणि तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो. आता तिथे दिलेला उमेदवार निवडणूनच आणणार आहे," असा इशारा अजित पवार यांनी दिला.