प्रफुल्ल पवार , झी मीडिया, रायगड : अजित पवार (Ajit Pawar) यांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे (NCP Jansanman Yatra) कार्यक्रम झाले. बारामतीसह अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना कोकणात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी रायगडची जागा राखली. त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना आमदारकीच्या पहिल्याच काळात मंत्रीपदाची संधी मिळाली. आदिती यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून अजित पवार यांनी आपल्या कोकण दौऱ्याची सुरुवात केली. अनेक विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणाही त्यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनतेसाठी आणलेल्या योजना कोणत्या आणि काय कामं केली हे सांगण्यासाठी जन सन्मान यात्रा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता आम्ही काय कामं केली हे सांगण्यासाठी आम्ही लोकांमध्ये आलोत. चुकीचे शब्द वापरणे टाळलं पाहिजे याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केली आहे. सबका साथ सबका विकास योजना किंवा केंद्रातील अनेक योजना सर्व समाजासाठी राबवल्या. राज्यातील योजनांमध्ये देखील सर्व समाजांचा समावेश असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.


कोकणात राष्ट्रवादीचे अवघे दोनच आमदार आहेत. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे आणि दुसरे चिपळूणचे शेखर नाईक. आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा शिंदे गटाच्या कर्जत मतदारसंघावर डोळा आहे. परंतु शिवसेना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडेल अशी चिन्हं दिसत नाहीत. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात सध्या जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात कोकणात आणखी एखादी जागा पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय.


लोकसभा निवडणुकीत भाजपचा राग शांत करून त्यांना आपलेसे केलेले सुनील तटकरे यांनी आता शिवसेनेशी पंगा घेतलाय. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विजयी झाले असले तरी हक्काचा मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावलाय . त्यामुळे अलीकडे केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा थेट निषेध करण्याचे धाडस तटकरे आणि अजित पवार यांनी दाखवलंय.


अजित पवार यांच्या कोकण दौऱ्यामुळे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना बळ मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे फार लाभदायक ठरणार असल्याची चर्चा आहे.