राजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
Ministerial offer, Cheating 5 BJP MLAs : 'झी 24 तास'वर राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याच प्रकरण उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या भामट्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा जवळचा असल्याची बतावणी करत भाजपच्या आमदारांना गंडवण्याचा प्रयत्न केलाय. नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव नीरजसिंह राठोड आहे. या भामट्याने भाजपचे मध्य नागपूरमधील आमदार विकास कुंभारे यांना 7 मे रोजी फोन कॉल केला होता. त्यांना मंत्रीपदाचा आमिष दाखवत पैशाची मागणी केली. मात्र विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
भामटा नीरजसिंह राठोड याने संपर्क केलेल्या आमदारांबाबत 'झी 24 तास'ला मिळालेल्या माहितीनुसार एक आमदार नागपूर शहर आणि एक आमदार नागपूर ग्रामीणचा आहे. तर दोन आमदार मराठवाडा येथील आहेत. त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा आणि नागालँड येथील आमदारांना अशा प्रकारे गंडवण्याचा प्रयत्न केला आहे. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखो रुपयांची रक्कम दिल्याची माहिती समोर आली आहे. याला एका आमदाराने दुजोरा दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे फसवणुकीचे हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून आंतरराज्य स्वरूपाचे आहे. या भामट्याने महाराष्ट्रात किती आमदारांना मंत्रिपदाचे अमीष दाखवून फसवणूक केली आहे हे तपासानंतरच उघडकीस येणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील पाच आमदारांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पैशांच्या मोबदल्यात मंत्रिपद, आमदारांना गंडा घातल्याचे आता उघड झाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
जे पी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून बोलतोय. साहेब बोलणार असे सांगत थेट बदनापूरच्या भाजप आमदार नारायण कुचे याना पैशांच्या मोबदल्यात मंत्री पदाची ऑफर देण्यात आली. नारायण कुचे यांनी दिल्ली ऑफिसमधून बोलत असल्यामुळे आणि नड्डा यांच्या जवळचा म्हणून जवळपास दोन लाख रुपये दिले सुद्धा. मात्र कुणीतरी फसवत असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी फोन उचलणे बंद केले. याबाबत आता ते पोलिसात सुद्धा तक्रार करणार आहोत, असे एका आमदारांने सांगितले. याबाबत नारायण कुचे आणि त्या फसवणूक करणाऱ्या भामट्याबाबत माहिती दिली आहे.