विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीका
अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.
वैभव बालकुंदे, झी 24 तास लातूर : अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाच महायुतीतला कलह मात्र दिवसेंदिवस वाढतोय. आणि आता त्यात भर टाकलीय ती लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुखांनी. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या पाठोपाठ आता लातूरचे भाजपचे नेते दिलीप देशमुखांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे तसंच क्रीडा मंत्री संजय बनसोडेंनी यांनी महायुतीतला वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतले मोठे नेते मोर्चेबांधणी करत असतानाच स्थानिक नेते राष्ट्रवादीला टार्गेट करताना दिसत आहेत.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीशी युती म्हणजे असंगाशी संग म्हणत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो, पण बैठक झाल्यानंतर बाहेर येऊन उलटी होते असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं होतं.
वडगाव शेरीचे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी महायुतीचा धर्म न पाळल्याबद्दल टीका केली होती. जुन्नरमध्ये भाजप नेत्या आशा बुचके यांनी जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले होते.
राष्ट्रवादी महायुतीत आल्याने आधी अर्धी भाकरी मिळणार होती आता पाव भाकरी मिळेल अशी खदखद भरत गोगावलेंनी बोलून दाखवली होती.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अजित पवारांनी बाबासाहेब पाटील यांना अडीच हजार कोटींचा निधी दिला. मात्र निधी वाटपात कायमच भाजपला डावलण्यात आल्याने लातूरचे भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत.
त्यामुळेच अजित पवारांची जनसन्मान यात्रा अहमदपूरला आल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील वाद उफाळून समोर आल्याचं पाहायला मिळाला. लातूरमध्ये आधी गणेश हाकेंनी तर आता दिलीप देशमुखांनी केलेल्या विधानामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतली दरी वाढण्याची शक्यता आहे.