Beed Loksabha Election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांची घोषणा होताच त्यांचा राजकीय वनवास संपला असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीकडून तयारी करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार म्हणून दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे पवार गट बीडमधून कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागलेली असताना ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समोर आलं. त्यामुळे ज्योती मेटेंना पंकजा मुंडेंविरोधात उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


"मी लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे. बीड जिल्ह्यात जात असताना येणाऱ्या पुणे मतदारसंघात माझे युवा मोर्चातील सहकारी मुरलीधर मोहोळ आहेत. मी त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. त्यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना मोठा विजय प्राप्त होवो. पुण्याच्या सेवेसाठी त्यांनी दिल्लीमध्ये जावं," असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


माझ्या विषयी कोणाच्याही मनात कटुता नाही - पंकजा मुंडे


"बीड जिल्हा अत्यंत पुढारलेला जिल्हा आहे. बीड जिल्ह्याने आतापर्यंत विविध समाजाचे खासदार निवडून दिले आहेत. बाहेरून बघणाऱ्याला जिल्ह्यात वोट बॅंकचे राजकारण दिसत असलं तरी मतदान जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो. गेली 22 वर्षे राजकारणात काम करत आहे. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्या नात्याने प्रत्येक गावाशी,  प्रत्येक जाती धर्माशी माझा समन्वय आहे. माझ्या विषयी कोणाच्याही मनात कटुता नाही. कटुता वाटले असेल असे कधीही वागले नाही. सर्वसमावेश धोरण असल्याने समोरच्याला उमेदवार म्हणूनच पाहते," असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.


"मी आत्ताच हुशार झालेली नाही. आधीपासूनच हुशार आहे. सध्या मी लोकसभेच्या उमेदवारीकडे लक्ष्य दिलं आहे. राज्याच्या जबाबदाऱ्या इथल्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत. ते व्यवस्थित सांभाळतील. पक्षाची ताकद वाढावी यासाठी जास्तीत जास्त योगदान देतील. मी जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष्य आहे,"


माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे - पंकजा मुंडे


"ही निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. 2004 पासून मी काम करत आहे. मी 17 वर्षांची असताना लोकसभेच्या प्रचारासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे मला खासदार म्हणून निवडून येण्यासाठी ते विरोधात उमेदवार देतील अशी अपेक्षा करणे हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखे आहे. ते त्यांच्या पक्षाचे ताकदवार उमेदवार देतील. त्यांच्या पक्षात नसतील तर बाहेरुन घेतील. त्यामुळे ते जे करतायत त्याच्याकडे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही. माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.