MNS Leader Vasant More : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी अखेर मनसेला (MNS) जय महाराष्ट्र केलाय. साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाय. वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. रात्री 12 वाजता त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली होती. 'एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही' अशी पोस्ट त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक (Loksabha 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्या अनुषंघाने त्यांनी तयारीही सुरू केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसंत मोरे यांचं पत्र
वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहित आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याची मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत आहे. पण अलीकडच्या काळात पूणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनायी आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे, म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे, असं वसंत मोरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.


पहिली ठिणगी केव्हा पडली?
राज ठाकरे यांनी (Mns Chief Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते. यावर पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आदेशाविरोधात भूमिका घेत आपल्या भागात भोंगे हटवणार नाही, हनुमान चालिसा लावणार नाही अशी भूमिका घेतली होती. या घटनेपासूनच मनसे आणि वसंत मोरे यांच्यात पहिली ठिणगी पडली. या घटनेनंतर अचानक पुणे शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली आणि साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे


कोण आहेत वसंत कृष्ण मोरे?
मनसेची पुण्यातील ओळख म्हणजे, वसंत कृष्ण मोरे. राज ठाकरे यांचे विश्वासू साथीदार, कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरी यांची ओळख आहे. वसंत मोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली. 2006 मध्ये राज ठआकरे यांनी मनसेची स्थापना केली आणि वसंत मोरे यांनीही मनसेत प्रवेश केला. तेव्हापासून वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. पुण्यात वसंत मोरे यांनी मसने रुजवण्याचं काम केलं. 2007 मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली. पहिल्याच निवडणुकीत पुण्यात मनसेचे 8 नगरसवेक निवडून आणले. या विजयात वसंत मोरे यांचा मोठा वाटा होता. 


2012 पुणे महानगर पालिकेत मनसेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. मनसेचे थेट 27 नगरसेवक निवडून आले. वसंत मोरे हे देखील जिंकले. यानंतर त्यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2012-2013 दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी पार पाडली. 2021 मध्ये राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. त्यांना मनसेचे पुणे शहराध्यक्ष बनवण्यात आलं. 


मनसेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग
मनसेच्या प्रत्येक आंदोलनात वसंत मोरे यांचा सक्रिय सहभाग राहिलाय. न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड असो की कारला लावलेले जॅमर तोडण्याचे प्रकार असो वसंत मोरे कधी मागे हटले नाहीत. यातूनच वसंत मोरे हे नाव पुण्यातपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालं.