Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह शब्दप्रयोगामुळे सध्या नवा वाद उफाळून आलाय. राज्यात सध्या विधिमंडळ नसून, 40 जणांचे चोरमंडळ आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथे केली होती. याच जोरदार पडसाद विधिमंडळात उमटले होते. यावरुन संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. यानंतर अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सभागृहातच खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी करण्यात आल्यानंतर गुरुवारी विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यासमोर याबाबत सुनावणी झाली. संजय राऊत यांचे विधान विधिमंडळाच्या परंपरा पायदळी तुडविणारे आहे. त्यामुळे विशेषाधिकारभंगाच्या या प्रकरणावर चौकशी होणे आवश्यक आहे. याप्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी संजय राऊत यांनी सात दिवसांत लेखी स्वरुपात खुलासा करावा, असे आदेश उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्यावर आता संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.


"मला फासावर लटकवणार आहेत का? तर लटकवा. तेवढंच शिल्लक आहे. तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावावर दिली आहे.


संजय राऊत यांचे स्पष्टीकरण


"विधिमंडळाबद्दल मला आदर आहे. मी 40 चोर किंवा गद्दारांबद्दल बोललो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना देशद्रोही म्हटलं. तर एका नेत्याने खासदारांना शिवी दिली. जर माझ्यावर हक्कभंगाची कारवाई होणार असेल, तर यांच्यावरही कारवाई करावी," असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं होतं.


दुसरीकडे ठाकरे गटाने सुरु केलेल्या शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान यात्रेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने शिवधनुष्य यात्रा काढण्याचे ठरवले आहे. लवकरत शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा सुरु होणार आहे.  अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार आहे. 'महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण' असे या यात्रेचे घोषवाक्य असणार आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना यांच्या यात्रा म्हणजे पैशांचा खेळ आहे, असे म्हटले आहे.


"धनुष्य नीट उचला. रावणानेसुद्धा धनुष्य उचललं होतं त्याचे काय झाले हे रामायणातून समजून घ्या. अशी ढोंग आणि सोंग महाराष्ट्रात चालत नाहीत. महाराष्ट्रामध्ये सचोटी आणि प्रामाणिकपणा चालतो. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अग्निपरीक्षेतून वारंवार बाहेर पडली आहे. त्यांच्या यात्रा म्हणजे सगळा पैशाचा खेळ असतो," असे संजय राऊत म्हणाले.