पवार-भुजबळ; गुरु-शिष्याचं घट्ट नातं, आज एकमेकांसमोर करणार शक्तिप्रदर्शन
Maharashtra Politics: शरद पवार यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. माझं शक्तीप्रदर्शन नाही तर मी येवल्यात जात असतो. पावसाचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे मला येवल्यात जावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील गुरु-शिष्याचं नातं अशी साऱ्यांना ओळख आहे. भुजबळ्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश ते आत्तापर्यंतच्या चांगल्या आणि पडतीच्या काळात शरद पवार पहाडासारखे पाठीशी उभे राहिले. तर छगन भुजबळ हे आजही शरद पवारांबद्दल बोलताना भावूक होतात. छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, ही गोष्ट राजकीय विश्लेषकांसाठी देखील धक्कादायक होती. पण छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या नात्यात अंतर आल्याचे दिसत आहे. कारण एकमेकांबद्दल प्रचंड आदर असणारे नेते आज एकमेकांविरोधात शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत.
भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात आज शरद पवारांची जाहिर सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार नाशिकच्या दिशेनं रवाना झालेत.. दरम्यान ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहेत.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये या सभेची तयारी करण्यात आली आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना पवार आजच्या सभेत काय उत्तर देणार? भुजबळ आणि अजित पवारांबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. दरम्यान पवारांच्या आजच्या सभेत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते सहभागी होणार आहे.
येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयावर शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. माझा फोटो लावू नये असे सांगून देखील या बॅनर पवारांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र सकाळी लावलेल्या बॅनरवरील फोटोसंध्याकाळी अचानक काढण्यात आले.
शरद पवार यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. माझं शक्तीप्रदर्शन नाही तर मी येवल्यात जात असतो. पावसाचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे मला येवल्यात जावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
छगन भुजबळ यांचा पराभव करु असे संजय राऊत म्हणाले होते. यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहे. पराभव करायचे की नाही हे जनता ठरवेल. संजय राऊतांनी आधी एका ठिकाणहून निवडून येऊन दाखवावे असा टोला त्यांनी लगावला.