सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी संध्याकाळी दिला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde Group) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावही मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच घटनातज्ज्ञांनीही या निकालाबाबत आपलं मत व्यक्त केले आहे. तर हा एक राजकीय भूकंप आहे आणि त्याचे किती परिणाम होतात हे येणार काळच ठरवेल अशी प्रतिक्रिया घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दिली आहे.


निर्णय देताना निवडणूक आयोगाला कळायला पाहिजे होतं - उल्हास बापट


"सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी निवडणूक आयोगाने हा निर्णय द्यायला नको होता. निवडणूक आयोगाकडे याबाबत परिपक्वता असणं आवश्यक होतं कारण याचे राजकीय परिणाम होऊ शकतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपण निर्णय द्यावा हेच निवडणूक आयोगाला कळायला पाहिजे होतं. या सगळ्याचा सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार केला तर आज हे सत्तेवर एक उद्या दुसरे सत्तेवर असतील. तात्पुरता विचार न करता भारतीय लोकशाही सुदृढ कशी होईल तसेच लोकशाही कशा रितीने व्यवस्थित चालेल याचा विचार आपण करायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया उल्हास बापट यांनी दिली.


चार-सहा दिवसात सुप्रीम कोर्टाचा निर्णय


"हा एक राजकीय भूकंप आहे. त्यामुळे त्याचे किती परिणाम होतात आणि किती त्याच्यामध्ये किती जण येतात हे काळच ठरवेल. आता चार-सहा दिवसात कदाचित सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू शकतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर का निवडणूक आयोगाच्या विरुद्ध लागला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आधी निर्णय देवून गंभीर चूक केली आहे असं माझं मत आहे," असे उल्हास बापट म्हणाले.


"काही लोक दबावाला बळी पडू शकतात सगळे पडतात असं नाही. काही लोक असतात ज्यांना विकत घेतले जाऊ शकत नाही. पण विकत घेतली जाणारी लोक असतात तेव्हा आपण घटनेचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे फार मोठी टीम आहे. त्यामुळे याविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येईल," असेही उल्हास बापट म्हणाले.