Prakash Ambedkar on Sanjay Raut : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप रखडलं आहे. मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. वंचितने महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केले. या निर्णयावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. यावर प्रत्युत्तर देताना वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना आणखी किती खोटं बोलणार? असा सवाल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नव्या आघाडीचे संकेत दिले होते. त्यासोबत उमेदवारांची घोषणा देखील केली. त्यानंतर भाजपला मदत होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका असे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना म्हटलं होतं. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर खोटे बोलल्याचा आरोपही केला आहे. जय राऊत किती खोटं बोलणार? तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 


"संजय राऊत किती खोटं बोलणार? तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात? सहयोगी असून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक्स इथल्या मीटिंगमध्ये तुमचे वागणं कसं होतं हे आम्हाला माहीत आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा मुद्दासुद्धा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे तुम्ही युतीचा आभास दाखवत आहात तर दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे कारस्थान करत आहात. हे तुमचे विचार आहेत?," असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.



यासोबत पाठीच सुरा खुपसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो देखील आंबेडकरांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सुरा खुपसलेल्या व्यक्तीवर वंचित तर हल्ला करणाऱ्या हातावर संजय राऊत असे लिहीलेलं आहे.


"या देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण सरकारकडून सुरू असलेला भ्रष्टाचार, संविधानाची हत्या यासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही आमचीच जबाबदारी नाही तर आंबेडकरांची आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतही पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत, आंबेडकर यांचे विचार आणि आमचे एक आहेत पक्के आहेत," असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.