Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना लिहीलेलं भावनिक पत्र व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  मनातली खंत उघड करायची आहे, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं गेलं असं भास्कर जाधवांनी या पत्रात म्हटलंय. त्यानंतर रविवारी भास्कर जाधव यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूण इथे संवाद साधताना पक्षांतर्गत वादावरुन निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आमचे वरिष्ठने नाव काढलं असं सांगतात. कोण हा वरिष्ठ? पक्षप्रमुखांबद्दल जे बोलले जात आहे त्याला उत्तर द्यायचं का नाही? ज्या पक्षाचे विश्वगुरू आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी असे बोलत असतील तर बरोबर नाही. घर भेद्यांकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. हा आमचा नाही. हा भास्कर रावांचा आहे त्याला बाहेर काढा हे कोण सांगत होते? चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत मी हे पहिल्यांदा पाहिले," असे म्हणत भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत वादावर थेट निशाणा साधला.


"मी काहीतरी मिळेल म्हणून लढत नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं होतं. मिळणे हा माझा हक्क होता. पक्ष फुटल्यानंतर कुणाला गटनेते करायला हवे होते? विधानसभेत कुणाचा आवाज आहे? मी बाकीच्याप्रमाणे माझ्या निष्ठेचे किस्से कुणालाही सांगत नाही. पण आज सांगायची वेळ आली आहे. तुम्ही कुठेही जा पण तुम्ही भाजप सोबत गेला तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नाही हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. यावर सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आज भास्कर जाधव लढतोय तो पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी लढतोय. गद्दारांपासून सावध करण्यासाठी हे पत्र होतं. मी माझ्या पोरासाठी काहीही करत नाही. त्याच्यात कर्तुत्व आहे तो पुढे जाईल. माझ्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुखावर अन्याय झाला त्यासाठी मी लढत आहे. आम्ही मैदान सोडणारी माणसं नाहीत. मी उद्धव ठाकरेंना सांगितलंय. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असेल ते असू द्या. तुम्ही काहीही करा, पण माझा शब्द आहे. पण मी तुम्हाला शब्द देतोय की, 2024 ची विधानसभा निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. कालच्या बातम्या मीडियाने पेरली की कुणी पेरल्या हे लक्षात ठेवा. शिवसेनेमध्ये माझ्या अनेक संधी हुकल्या पण मी नाराज नाही," असे भास्कर जाधव म्हणाले.


'मी तपास संस्थांना घाबरत नाहीये, भाजपा नेत्यांनी माझा खून करण्याचं जाहीर सभेत म्हटलं. तेव्हा शेवटचं षडयंत्र म्हणून मला बदनाम करण्याचं काम चालू आहे. पक्ष सोडून जाणं वगैरे माझ्या मनातही नाही. रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा आहे का?' असेही भास्कर जाधव म्हणाले.