मुंबई : Maharashtra Legislative Council Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिलीय. त्यानुसार 2 जूनला विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. 9 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. तसंच या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपचे प्रवीण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील टर्म संपतेय. त्याच जागांवर निवडणूक होणारे आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपाच्या आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला 4 जागा निवडून आणता येतील असं चित्र आहे. 


याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 जागा आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला आणखी एका जागेसाठी म्हणजेच 10व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच टक्कर होण्याची शक्यताय.


राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 20 जून रोजी या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात येत आहे. 


राज्यातील राजकीय घडामोडींना येणार वेग आला आहे. राज्यसभेनंतर अवघ्या 10 दिवसांत राज्य विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडीच्या हालचाली वाढल्या आहेत.