Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा...
Maharashtra Rain : सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जोर धरलेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा बहुतांश भागामध्ये हजेरी लावली आणि आता महिना अखेरच्या टप्प्यावरही तो काही भागांमध्ये पाय रोवून उभा असल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra Rain : मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असून, मध्येच लख्ख सूर्यप्रकाश आणि मध्येच दाटून येणाऱ्या काळ्या ढगांची गर्दी हे असं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. तिथं नवी मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्येही परिस्थिती वेगळी नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळं गणेशोत्सवाच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवसांसाठी राज्यात पावसाचं असंच काहीसं चित्र पाहायला मिळेल.
विदर्भाच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर असेल, तर कोकणातही पावसाची दमदार हजेरी असेल. 22 सप्टेंबरपर्यंत पावसाची उपस्थिती पाहता हवामान विभागानं आता या भागांना यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळं नागरिकांनाही हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
पुढील चार दिवस कोकणात मुसळधार
विदर्भात पावसाची दमदार हजेरी असण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता कोकणातही 26 सप्टेंबरपर्यंत पाऊस बसरणार अल्याचं हवामान विभागानं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळं विदर्भ आणि कोकणासाठी पुढील चार दिवस पावसाचे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पुढील 24 तासांसाठी कोकणासह विदर्भातील 14 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असंही सांगण्यात आलं आहे. तिथं दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या काही भागांनादेखील पाऊस दर्शन देणार आहे. असं असलं तरीही हा इतक्या कमी पावसानं मराठवाड्याची तहान भागणार नाही ही वस्तूस्थिती मात्र नाकारता येत नाही.
हेसुद्धा वाचा : गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांसाठी BMC ची हायटेक व्यवस्था; आधीच मंडळाकडून घेता येणार वेळ
कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
सध्या बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिमेला सरकला असून त्यामुळं चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे असं असतानाच याचे थेट परिणाम राज्यातील पर्जन्यमानावर होताना दिसत आहेत. त्यामुळं सप्टेंबरचा शेवटतही या पावसानं होणार असून, ऑक्टोबरपर्यंत त्याचा मुक्काम वाढू शकतो असा अंदाज आहे.