Maharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा
Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे.
Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसानं केली. पाहता पाहता संपूर्ण गणेशोत्सवही या पावसानंच गाजवला आणि महिन्याच्या शेवटीसुद्धा या वरुणराजानं चांगलीच हजेरी लावत सर्वांना आनंद दिला. पावसाच्या येण्यानं बळीराजासुद्धा सुखावला. असा हा पाऊस सध्या देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट धरताना दिसत आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील त्याला मुक्काम मात्र ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वाढल्याचंही नाकारता येत नाही. हवामान विभागानंच राज्यातील परतीच्या पावसाची तारीख वाढल्याचं स्पष्ट केलं.
पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त करत IMD नं दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम तर, काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देईल असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची अधूनमधून बरसात होईल. तर, अधूनमधून विजांच्या कडकडाटामुळं सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असं चित्रही शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि शहराला लागून असणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती असेल.
हेसुद्धा वाचा : TCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम
कमी दाबाच्या क्षेत्रामुळं...
कर्नाटकच्या उत्तर किनारपट्टी भागासह दक्षिण कोकण आणि गोव्यानजीक पूर्वमध्य अरबी समुद्रावर एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हे क्षेत्प पुढील 24 तासांमध्ये धीम्या गतीनं पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेनं पुढे सरक असून, त्यामुळं म्यानमार आणि त्यालगतच असणाऱ्या बंगालच्या उपसागरावरही चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. परिणामी गोवा, महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, केरळ , तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीआहे. देशाच्या उत्तरेकडे पावसाचं प्रमाण कमी सांगण्यात आलं असून काही भागांमध्ये थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.